अबब ! 28 वर्षीय युवकाच्या पायाला एवढा मोठा गोळा…

बातमी कट्टा:- पाच वर्षांपासून पायावर कॅन्सरग्रस्त गाठ घेवून त्रस्त जीवन जगणा-या तरूणाला जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टर्स चमुने जीवनदान दिले आहे. सदर तरूणाच्या पायावरील भली मोठी कॅन्सरग्रस्त गोळा नामशेष करण्यासाठी त्याच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करत त्याचा पाय काढावा लागला आहे. त्यामुळे सदर तरूणाचा त्रास कमी होवून त्याला काही प्रमाणात आराम मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की धुळयातील मोहाडी येथील विकास सोनवणे नामक 28 वर्षीय युवक मागील पाच वर्षांपासून कॅन्सरच्या मोठया गाठीने त्रस्त होता. त्याच्या पायावर मांडीजवळ कॅन्सरची लागण होवून 110 सेंटीमीटर गोल आकाराचा मोठा गोळा तयार झाला होता. या गोळयाचा आकार उंचीने ४४ सेंटीमीटर तर रूंदीने ३७ सेमी इतका होता. त्यामुळे मांडीजवळ सदर तरूणाचा पाय हत्तीच्या पायाच्या आकाराचा झाला होता.भला मोठा पाय घेवून त्या तरूणाला दररोजचे जगणे कठीण झाले होते. अवजड पायामुळे त्याला एका कुशीवर झोपता येत नव्हते. शिवाय दिवसेंदिवस या गोळयाचा आकार वाढत असल्याने कॅन्सर हा छातीपर्यंत पोहचत होता. पायावरील या अवघड दुखण्यावर उपचार करण्यासाठी सदर तरूण मुंबई, पुणे, नाशिक असा सगळीकडे जावून आला. परंतु पायावरील ही गाठ काढण्यासाठीचा खर्च खूप जास्त असल्याने त्याला ते परवडणारे नव्हते. अखेर जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये सदर तरूण दाखल झाला. त्याची हालाखीची, गरीबीची परिस्थ‍िती लक्षात घेत त्याच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय संचालक तसेच अधिष्ठाता यांनी घेतला.

त्यानुसार काही दिवसांपूर्वीच सदर तरूणावर अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत महाले यांनी शस्त्रक्रिया करत त्याचा पाय कमरेपासून खाली काढून टाकला. भल्यामोठया गाठीमुळे पाय काढून टाकावा लागला असला तरी त्यामुळे सदर तरूणाचा त्रास खूप कमी झाला आहे. हा पाय काढल्याने त्याला दोन्ही कुशीवर झोपता येवून, दैनंदिन कामे करणे सोपे होईल असे मत डॉ. महाले यांनी व्यक्त केले. पाच वर्षांपूर्वी या तरूणाला कॅन्सरचा त्रास होता. वेळीच उपचार न मिळाल्याने गोळयाचा आकार वाढत गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पायाव्दारे कॅन्सर हा छातीपर्यंत पोहोचला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. सदर तरूणावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत महाले यांच्या समवेत डॉ.आकाश मेतकर, डॉ.एन.बी.गोयल, डॉ.जेम्स कुरीस, डॉ.अमेय ठावरे, डॉ.रोहीत सिंग, भूलतज्ञ डॉ.मानसी पानट, डॉ.सुशील भदाणे यांनी परिश्रम घेतले. सदर युवकावर मोफत उपचार करण्यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.भाईदास पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ.ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मधुकर पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

WhatsApp
Follow by Email
error: