आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला केली सुरुवात..

बातमी कट्टा:- उसनवार दिलेल्या पैशांची व्याजासकट परतफेड केल्यानंतरही शेती बळकावण्यासाठी दबाव आणून खोटी कागदपत्रे व गावगुंडांची भीती दाखवणाऱ्यांविरुध्द सावकारीसह गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी चार दिवसापासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाहेर साखळी आंदोलन करणाऱ्या शेतकरी कुटूंबाने आंदोलनस्थळीच गुढी उभारुन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

आंदोलनकर्ते नारायण सोनार यांनी सांगितले की, ते सध्या शहादा येथे वास्तव्यास आहेत.त्यांच्या मालकीची शिरपूर खुर्द शिवारात गट नं.117/4 मध्ये एक हेक्टर 27 आर शेती आहे. त्यांच्या शेताशेजारीच शिरपूर मर्चंट बँकेचे प्रसन्न जैन व हर्षल जैन यांची शेती आहे.तोंडओळख असल्यामुळे बियाणे,खते आदिंसाठी ओंकार सोनार यांनी जैन यांच्याकडून काही रक्कम उसनवारीने घेतली होती.त्याची व्याजासकट परतफेडही करण्यात आली.मात्र मोक्याची जमीन असल्यामुळे ती बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मिळकतीशी काहीही संबंध नसतांना सौदापावती असल्याचे सांगून दिशाभूल करीत शेती बळकावण्याचे कारस्थान करीत आहेत.त्या शेतात सुळबाभूळची व्यापारी तत्वावर लागवड केली असून सध्या सुळबाभूळ कापणीवर आहे. मात्र शेतात गेल्यावर गावगुंड बोलावून मनाई करण्यात यते. स्वत:ची शेती कसण्यास विरोध केला जात आहे. शेतातील सुळबाभूळ परस्पर कापण्याचा दोघांचा डाव आहे. सुळबाभूळ काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.हक्काच्या शेतीत पेरणी,मशागत,पीक कापणी आदी कामे करता येत नसल्यामुळे आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

जैन बंधू जबाबदार आहेत.अवैध सावकारीसह त्यांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी असल्याने शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर उपोषणास बसल्याचे सोनार यांनी सांगितले.त्यांच्यासोबत पुरुषोत्तम सोनार, छोटू सोनार, राजेंद्र सोनार, सौरभ सोनार, छायाबाई सोनार, वंदनाबाई सोनार,रेखाबाई सोनार,जागृती सोनार,सुनील सोनार हे देखील उपोषणात सहभागी झाले आहेत.चार दिवसांपासून आंदोलन सुरु असतांना संबधीत विभाग लक्ष देत नसल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंदोलनस्थळीच गुढी उभारून आमरण उपोषणाची सुरुवात आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: