
बातमी कट्टा:- ऊसाच्या शेताला विजेच्या शॉर्टशर्कीट मुळे आग लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि 4 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

शहादा तालुक्यातील बामखेडा येथील रोहिदास एकनाथ चौधरी वय 65 यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनात दिलेल्या माहिती नुसार रोहिदास चौधरी व त्यांचा लहान भाऊ संजय ऐकनाथ चौधरी वय 56 यांची बामखेडा शिवारात शेती आहे.आज दि 4 रोजी सकाळी शहादा बर्हाणपुर रोडलगत असलेल्या शेतातील पश्चिम बाजुच्या क्षेत्रातील गट नं 129 च्या शेतात संजय चौधरी हजर असतांना त्यांच्या गट नं 124 च्या ऊसाच्या क्षेत्राला विजेच्या शॉर्टशर्कीटमुळे अचानक आग लागली.

आगीने पेट घेतल्याने ती आग जवळील गव्हाच्या पिकांना लागू नये म्हणून संजय चौधरी हे आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेत शक्य तेवढे आग विझविण्याचा प्रयत्न करत असतांना संजय चौधरी आग विझविण्यासाठी ऊसाच्या शेतामध्ये गेले.मोठे भाऊ रोहिदास चौधरी यांनी आवाज दिला तरी संजय चौधरी यांचा आवाज आला नाही.ऊसाचे संपूर्ण पिक जळून आग विझल्यानंतर साधारण 1 ते दिड तासात रोहिदास चौधरी यांनी भाऊ संजय चौधरी यांचा शेतात शोध घेतला असता. संजय चौधरी यांचा ऊसाच्या शेतात पाय अडकून व पुर्ण जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली होती. याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

धुळे नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यातच ऊस तोडणी होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.यात शेतातून विजेचे तार गेल्याने शॉर्टशर्कीट मुळे ऊसाचे क्षेत्र जळून खाक होत असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान भोगावे लागत आहे. यातच आता या ऊसाला लागलेल्या आगीने एका शेतकऱ्याचा जिव घेतल्याशे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
