बातमी कट्टा:- पत्त्यांचा डाव रंगल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांच्या (एलसिबी) पथकावर जुगारींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेनंतर पोलीसांनी १९ जणांंना ताब्यात घेतले असून चार संशयित अद्याप फरार आहेत.या हल्ल्यात पाच पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील वरखेड गावात श्री.बहिरम यात्रोत्सवात श्री बहिरम मंदिराच्या पाठीमागे एका घरात पत्त्यांचा डाव रंगल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली.या कारवाईसाठी पथक रविवारी दि १९ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कारवाईसाठी वरखेडे येथे पोहचले.पत्त्यांचा डाव सुरु असतांनाच पोलीसांनी छापा टाकला.यावेळी जुगारी संतप्त झाल्याने त्यांनी पोलीस पथकावरच हल्ला करत मारहाण केली व तेथून पळून गेले.अचानक पोलीसांवर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. या हल्ल्यात एलसिबी पथकातील तुषार पारधी,मयुर पाटील,योगेश ठाकूर, जगदीश सुर्यवंशी व योगेश साळवे हे पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले.याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी जुगार खेळणाऱ्यांची धरपकड सुरू करत रात्रीतून १९ जणांना ताब्यात घेतले तर चार संशयित फरार आहेत.


