बातमी कट्टा:- गीता आणि कुराण हे वेगवेगळे नसून एकच संदेश देणारे धर्मग्रंथ आहेत हे ओळखून लहानपणापासून वैष्णव संप्रदाय धारण करणारे धर्माने मुस्लिम असतांना वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे हभप ताजुद्दीन शेख महाराज यांचे काल धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जामदा येथे कीर्तन सुरु असतांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली.
ह.भ.प ताजोद्दीन शेख महाराज यांचे रात्री धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामदे येथे कीर्तन सुरु असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.जामदे येथे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सप्ताह निमीत्त ह.भ.प ताजोद्दीन शेख महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.किर्तन सुरु असतांना 48 मिनीटे झाली होती. महाराज उभे राहून किर्तन करत असतांना त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने ते खाली बसले मात्र त्रास होऊ लागल्याने त्यांनी जवळील वारकरीच्या मांडीवर डोके टेकले. उपस्थित स्थानिक नागरिक तात्काळ महाराजांना नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यावरच महाराजांची प्राणज्योत मालवली.
हिंदू – मुस्लिम ऐक्याचा प्रतिक म्हणून महाराष्ट्राभर वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रचार प्रसार केला,धर्माने मुस्लिम असले तरीही ताजुद्दीन महाराज नित्यनियमाने हरिपाठ,भजन किर्तन व नाथषष्ठीला पैठणची तर आषाढीला पंढपूरची वारी करत असत.धर्माच्या नावाने कारणावरून ऐकमेकांचा द्वेष करणाऱ्या लोकांसाठी ताजुद्दीन महाराज हे आदर्श म्हणावे लागतील. महाराष्ट्र राज्यासह इतरत्र देखील त्यांचे किर्तन झाले आहेत.या घटनेमुळे वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त होत आहे.