बातमी कट्टा:- शेतीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी आलेल्या कामगाराचा दि १२ रोजी शेतात मृतदेह आढळून आला होता. डोक्याजवळ घाव घालून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.याबाबत पोलीसांकडून खून करणाऱ्या संशयिताचा शोध सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने संशयिताला सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सातारा जिल्ह्यातील शेती सपाटीकरणाचा व्यवसाय करणारे दोन युवक धुळे तालुक्यातील बोरकुंड भागातील रतनपुरा येथे शेती सपाटीकरणाच्या कामासाठी आले होते.त्यातील एकाचा दि १२ रोजी शेतात एम एच 11 डी ए 1739 क्रमांकाच्या ट्रॅक्टर जवळ मृतदेह आढळून आला होता.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी आणि पोलीसांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे मृत व्यक्तीचे नाव आदर्श दत्तात्रय पिसाळ वय २३ रा.शेरेशिंदेवाडी जि.सातारा असे असल्याचे निष्पन्न झाले होते.डोक्यात घाव घातल्याने आदर्श पिसाळ याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर त्याचा शेती सापाटीकरणासाठी आदर्श पिसाळ सोबत असलेल्या रोहिदास दादासाहेब जाधव वय ३५ रा.निवळक ता.फलटन जि.सातारा घटनास्थळी नसल्याने रोहिदास जाधव याचा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाकडून शोध सुरु होता.
यावेळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहिती नुसार पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर वैसाणे, संदिप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदी पथकाला पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यात रवाना केले.सातारा जिल्ह्यातील निवळक गावात सापळा लावून संशयित रोहिदास जाधव याला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता शेती सपाटीकरणाच्या मजुरीच्या पैशातून आदर्श पिसाळ आणि रोहिदास जाधव यांच्यात वाद झाला होता.या वादातच रोहिदास जाधव याने ट्रॅक्टरच्या स्टॅपलींग रॉडने आदर्श पिसाळ यांच्या डोक्यात वार केल्याने आदर्श दत्तात्रय पिसाळ यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.


