बातमी कट्टा:- धुळे येथे उपोषणाला बसलेल्या वृध्दाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.उपोषण सुरु असतांना प्रकृती खालावल्याने धुळे हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.काल सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणकर्ता वृध्दाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील दुसाणे येथील भदाणे कुटुंबीयांवर काही लोकांकडून अन्याय होत असल्याच्या कारणावरून धुळे शहरातील क्युमाईन क्लबजवळ सुधन्वा भदाणे हे त्यांच्या पत्नीसह काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसले होते.उपोषण करत असताना सुधन्वा भदाणे यांची प्रकृती खालावली,त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान काल दि 20 रोजी सायंकाळी सुधन्वा भदाणे यांचा मृत्यू झाला.प्रशासनाकडून टाळाटाळ केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी भदाने यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.