बातमी कट्टा : उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कल्पकतेतून तसेच मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शिरपूरच्या नागरिकांना उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी रविवारी दि. ६ जून रोजी वैदिक वैज्ञानिक यज्ञ पद्धतीने “यज्ञ थेरेपी” संपन्न होत असून संपूर्ण शहरातून यज्ञ यात्रा काढण्यात येत आहे.

शिरपूरच्या लोकांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी वैदिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने पर्यावरण शुद्ध करण्यासाठी “वैदिक वैज्ञानिक यज्ञ यात्रा” निघणार आहे. शिरपूर शहरातील खालचे गाव बालाजी मंदिर येथे रविवारी दि. ६ जून रोजी दुपारी ३.३० वाजता यज्ञ सोहळा सुरु होईल. त्या नंतर सायंकाळी ५ वाजता श्री बालाजी रथोत्सव मार्गाने म्हणजेच पुरा गल्ली, पाटील वाडा, शिंपी गल्ली, माळी गल्ली, मारवाडी गल्ली, अग्रवाल भवन, विजल उपहार गृह, राम मंदिर, चौधरी गल्ली, दादा गणपती गल्ली, जैन गल्ली, वरचे गाव बालाजी मंदिर, पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल, भवानी माता मंदिर, पाताळेश्वर मंदिर चौक, विजय स्तंभ, खालचे गाव बालाजी मंदिर पर्यंत यज्ञ यात्रा मार्गक्रमण करेल. यज्ञ यात्रा ३ कि.मी. लांब राहणार असून या यज्ञ यात्रेत २० मोबाइल यज्ञकुंड सोबत राहतील. २५ स्वयंसेवक ३ किलोमीटर अंतर शास्त्रीय पद्धतीने हवन करत मानव, प्राणी, पक्षी, वनस्पतींसह संपूर्ण पर्यावरणाचे शुद्धीकरण करण्यात येईल. म्हणजेच वातावरणातील विषाणू नष्ट करणे तसेच अशुद्ध वातावरण शुद्ध करण्याचा हा शास्त्रीयदृष्ट्या यशस्वी ठरलेला प्रयोग प्रत्यक्षात शिरपूरात होणार आहे.
या प्रार्थना- यज्ञातील औषधी धुरापासून आपले सर्वांचे आरोग्य चांगले होण्यासाठी यज्ञ यात्रेच्या वेळी घराच्या व कार्यालयाच्या खिडक्या सर्वांनी उघड्या ठेवाव्या.ही यज्ञ यात्रा यज्ञ-थेरापिस्ट आणि यज्ञ यात्रेचे संस्थापक डॉ. ओम त्रिवेदी (भावनगर, गुजरात) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत संपन्न होत आहे. यावेळी यज्ञ यात्रा प्रसंगी कोविड-१९ च्या शासकीय नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात येणार आहे.
पूर्णपणे शास्त्रीय आधारावर यज्ञ सोहळा व यज्ञ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरण शुद्धीचा हा शास्त्रीय आधारावरील प्रयोग जनमानसाच्या आरोग्याला लाभदायक ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मानव जातीला अतिशय धोकेदायक व गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. शास्त्रीय आधारावरील हा यज्ञ सोहळा, यज्ञ यात्रा, यज्ञ थेरेपी सर्वांच्या जीवनात अविस्मरणीय क्षण ठरणार असून उत्तम अशा या धार्मिक कार्यक्रमाला नागरिकांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या वैदिक वैज्ञानिक यज्ञ यात्रेतून व यज्ञ सामग्रीच्या माध्यमातून संपूर्ण शिरपूर शहरात शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शास्त्रीय दृष्ट्या अनेक ठिकाणी यशस्वी व प्रभावी ठरलेल्या या यज्ञ सोहळ्यातून निरोगी वातावरण तयार होण्यास मदत मिळणार असून अतिशय उपयुक्त अशा या वैदिक वैज्ञानिक यज्ञ यात्रेतून सर्वांना उत्तम आरोग्य लाभो या संकल्पनेतून उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व संपूर्ण पटेल परिवार हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे.