बातमी कट्टा :- धुळे जिल्ह्यात पेसाच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली की, धुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन नोकर भरती करण्यात यावी. धुळे जिल्हा हा अंशत: 5 व्या अनुसूचित असून, 'पेसा' कायद्याच्या कक्षेत आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अधिसुचनेनुसार पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची सरकारी पदे ही स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरणे भाग आहे. मात्र असे असतांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील सर्व खाती, जिल्ह्यातील सर्व प्रकारची सरकारी व नीम सरकारी कार्यालये, आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, संस्थांची अनुदानीत विद्यालये आदी ठीकाणी 'पेसा' कायद्यांतर्गत अनुसूचित जमातिचा पदभरतीचा अनुशेष हजारोंच्या संख्येने रिक्त आहे. तो अनुशेष पूर्ण क्षमतेने स्थानिक अनुसूचित जमातिच्या उमेदवारांमधून भरण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले. यावेळी विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग, वसंत पावरा अध्यक्ष धुळे जिल्हा, साहेबराव पावरा सचिव धुळे, ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष शिरपूर यांनी उपोषण केले. तदनंतर शासकीय विश्रामगृह येथे मा. अब्दुल सत्तार यांनाही निवेदन देऊन पेसा नोकर भरती लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.