बाल विवाह घडवून आणणारा “पोलीस पाटील” निलंबित
जिल्हा प्रशासनाची कडक कार्यवाही

बातमी कट्टा:-धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, यांच्या सुचनेनुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन बाल विवाह प्रतिबंध कायद्याची व १०९८ चाईल्ड हेल्पलाईन बाबत मोठया प्रमाणात जनजागृती सुरु आहे. त्यामुळे गावा-गावातील ग्रामस्थ स्वतः तक्रारीसाठी पुढे येत असल्याने धुळे जिल्ह्यात बाल विवाह थांबविण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु धुळे तालुक्यातील सांजोरी गावात कायद्याच्या विरोधात जाऊन बालविवाहास प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रशासनाने पोलीस पाटलालाच कायद्याचा बडगा दाखवून निलंबित केले आहे.


धुळे तालुक्यातील सांजोरी गावात 22 मे, 2023 रोजी बाल विवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड लाईन १०९८ वर प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस यंत्रणा, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी, स्थानिक यंत्रणा घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची माहिती सत्यम गांधी (भा.प्र.से.), गट विकास अधिकारी, पंचायत समिती, धुळे यांना प्राप्त होताच ते स्वतः विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करत होते. मौजे सांजोरी ता. जि. धुळे या गावातील पोलीस पाटील निंबा सुरेशसिंग पवार यांनी त्यांचा मुलगा विजय निंबा पवार वय-२४ याचा मौजे पुरमेपाडा येथील बालिका वय वर्ष-१६ हिच्याशी 22 मे रोजी विवाह करण्याचे नियोजन केले होते. घटनास्थळी कागदपत्रांची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झालेनंतर संबंधित कुटुंबाला तसेच बाल विवाह घडत असतांना उपस्थित घटक बॅण्डवाले, डीजे चालक, भटजी, आचारी, फोटोग्राफर यांना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. सर्वांची सत्यम गांधी यांनी स्वतः चौकशी करुन पुढील कारवाई करण्याचे पोलीस यंत्रणेला आदेश दिले. त्याचबरोबर निंबा पवार हे सांजोरी गावाचे पोलीस पाटील असल्याने ग्राम बाल संरक्षण समितीचे पदसिध्द सदस्य आहेत. त्याअनुषंगाने निंबा पवार यांची पोलीस पाटील व ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य म्हणुन बाल विवाहास प्रतिबंध करणे तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात जनजागृती करणे अशी त्यांची कायदेशीर जबाबदारी असताना देखील त्यांनी त्यांचे स्वतःचे मुलाचे लग्न अवघ्या १६ वर्षाच्या मुलीसोबत लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मौजे सांजोरी येथील पोलीस पाटील यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याबाबत योग्य ती शास्तीविषयक कारवाई करणेसाठी सत्यम गांधी (भा.प्र.से.), गट विकास अधिकारी, पंचायत समिती, धुळे यांनी तृप्ती धोडमिसे, (भाप्रसे), सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, धुळे भाग, धुळे यांचेकडे प्रस्ताव सादर केला.
त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ कलम ६ (सात) नुसार निंबा सुरसिंग पवार, पोलीस पाटील, सांजोरी, ता. जि. धुळे यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पोलीस पाटील निंबा मोरे यांनी कारणे दाखवा नोटीसीचा लेखी खुलासा सादर केला असता हा खुलासा असमर्थनीय व बचावात्मक स्वरुपाचा असल्याने तो अमान्य करुन त्यांचेवर बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील तरतुदी अन्वये विवाहासाठी वधुचे वय १८ व वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे बंधनकारक असतांनाही त्यांनी हा बाल विवाह करण्याचे नियोजन केलेले होते. हा बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा असून बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील कलम ९, १० व ११ चे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती पहाता श्री.निंबा सुरसिंग पवार, पोलीस पाटील सांजोरी ता.जि.धुळे यांनी गैरवर्तणुक व कर्तव्यात कसुर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे सहाय्ये जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, धुळे भाग, धुळे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ कलम ९ (घ) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन निंबा पाटील, पोलीस पाटील, सांजोरी, ता. जि. धुळे यांना पुढील आदेश होईपावेतो निलंबित केले आहे.
ही कारवाई “शुन्य बाल विवाह गांव” या दिशेने पुढचे पाऊल असून आपापल्या गावात बाल विवाह होऊ नये याबाबत खबरदारी घेणे, आपल्या गावात जनजागृती करणे ही जबाबदारी ज्या स्थानिक घटकांवर आहे त्या घटकांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कायद्याचा धाक सामान्यांना कसा बसेल यादृष्टीने सदरची कारवाई निश्चितच मार्गदर्शक ठरेल. असे सतिश चव्हाण, जिल्हा बाल संक्षरण अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: