बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार !

बातमी कट्टा:- बिबट्याने वासरूचा फडशा पाडल्याची घटना आज दि 8 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी वनविभागाने पंचनामा केला असून पायाया ठस्सयावरून हिंस्त्र प्राणी बिबट्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेमुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील त-हाडी शिवारातील गट क्रमांक ३४/१ हे माधव सोनु बागुल यांच्या मालकीचे क्षेत्र असून,शेतातील गोठ्यात गाय, वासरू बांधलेले होते.माधव सोनु बागुल व भुषण बागुल हे दोघेही रात्रीला जेवण करून शेतातच होते. परंतु रात्रभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकरी बागुल हे झोपडीतच झोपले होते.सकाळी गुरांच्या गोठ्यात साफसफाई साठी गेले असता, त्यांना वासरू मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले.शेतात वन्यप्राणी शिरून वासरूला फस्त केले असून शरीराला अनेक ठिकाणी लचके तोडल्याचे दिसून आले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य,तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.याठिकाणी नदी काठी शेत असून आजूबाजूला ऊसाचे व कपाशीचे शेती असल्याने वन्यप्राण्यांचा अधिवास वाढलेला असून शेतकऱ्यांचे नुकसान होत असते.

वनविभागाचे वनपाल वासर्डी पी ए पाटील, वनरक्षक प्रशांत लांडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ओझरकर यांनी घटनास्थळी पंचनामा, जबाब करून शवविच्छेदन करून उत्तरीय कार्यवाही केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे मिळून आले, त्यावरून सदरचा वन्यप्राणी हा बिबट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.सदरील घटनेत शेतकरी माधव सोनु बागुल व  भुषण बागुल यांचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: