
बातमी कट्टा:- विहीरीच्या कठड्या जवळ उभे असतांना अचनाक कठड्याची माती खचल्याने तीन जण विहीरीत जाऊन कोसळल्याची घटना घडली आहे. यात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने आई आणि मुलगा दोघांचा मृत्यू झाला आहे.तर एकाला वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील मोरशेवडी गावाजवळ असलेली एक विहीर खचल्याने तिघेजण विहीरीत पडून मातीच्या ढिगार्यात अडकले. या घटनेमध्ये भिका पवार यांना वाचवण्यात यश आले असून, सुनीता पवार आणि त्यांचा मुलगा शाम पवार यांचा मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने मृत्यू झाला आहे. हे तिघे ही जण विहीरीच्या कठड्याजवळ उभे असतांना विहीरीची अचानक माती खचली आणि हे तिघे विहीरीत जाऊन पडले.सुनीता पवार आणि श्याम पवार हे विहिरीच्या तळात अडकून पडले त्यावर मातीचा ढीग जाऊन पडला.तर भिका पाटील हे आपल्या मानेपर्यंत गाळामध्ये रूतले, आरडाओरड केल्यावरती शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांना मदत करून बाहेर काढले.विहीर खोल असल्याने आणि त्यात सात ते आठ फूट पाणी असल्याने बचाव कार्यात अडचणी निर्माण झाली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने पोलीस मदत कार्य करीत होते.यात सुनीता पवार आणि श्याम पवार दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
