
बातमी कट्टा अमोल राजपूत:- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात भाजपाला मोठा विरोध दिसला.या भागात कॉंग्रेसने मोठ्या मतांनी मुसंडी मारली होती.याच आधारे आता विधानसभा निवडणुकीबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहे.मात्र लोकसभा प्रमाणेच विधानसभा निवडणुकीचे चित्र राहील की विधानसभेचे चित्र वेगळे राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र यासोबतच सांगवी दंगल प्रकरण,साखर कारखाना, सुतगिरणी अशा अनेक मुद्द्यांवर विधानसभा गाजणार आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाने बाजी मारत खासदार पदी गोवाल पाडवी विराजमान झाले. लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वांचे विधानसभेकडे लक्ष वळले आहेत.शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत काय चित्र असणार याबाबत राजकीय विश्लेषकांकडून तर्कवितर्क लावण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात भाजपाला प्रचंड विरोधाचा समना करावा लागला.हा विरोध विधानसभेत देखील बघायला मिळणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.असे असेल तर भाजपाचे आमदार अमरिशभाई पटेल यांची याबाबत काय रणनिती असेल ? गेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान मोदी लाट सुरु असतांना भाजप पक्षातून डॉ जितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण तालुक्यात भाजपमय वातावरण निर्माण केले होते.मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमरिशभाई पटेल आणि आमदार काशिराम पावरा यांनी कॉंग्रेस पक्षातून भाजप पक्षात प्रवेश करत आमदार काशिराम पावरा यांना भाजपाने उमेदावरी दिली होती.यामुळे त्यावेळी भाजपचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी भाजपला रामराम करत अपक्ष राहुन भाजपचे आमदार काशिराम पावरा यांना कडवे आव्हान दिले होते.
आता पुन्हा भाकर फिरली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात असलेले भाजपमय वातवरणात आता बद्दल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.पण असे असले तरी महाविकास आघाडी शिरपूर तालुक्यातून कोणाला उमेदवारी देते ?तो उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी किती सक्षम आहे ? सध्या तरी सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु असतांनाच महाविकास आघाडीतर्फे मात्र अद्याप कुठलीही हालचाल दिसून येत नाही.त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देतील हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे.