बातमी कट्टा अमोल राजपूत:- शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाच्या पिकांना आग लागून झालेले लाखोंचे नुकसान,सातबारासाठी पायीपीट करणारे शेतकरी,वेळेवर ऊस तोडणी न होत असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान,महावितरण विभागाने अचानक विद्युत पुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांनी महावितरण विभागावर काढलेला मोर्चा,यामुळे शेतकऱ्यांवर दाखल होणारे गुन्हे त्यातच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाची भुईकोट काट्यावर मोजमाप न होता प्रत्येक मापात एक किलोची कट्टी कापल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होत असलेले नुकसान,बँकेत कर्जमाफी न झाल्याने उपोषण करणाऱ्या वृद्ध महिला शेतकरी हे सर्व काही बघता शिरपूर तालुक्याची आजची खरी परिस्थिती काय हे आपण समजू शकतो.शेतकरी फाऊंडेशन किंवा नगरसेवक हेमंत पाटील अन्यथा समाजसेविका डॉ. सरोज पाटील यांना वगळता तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेले दिसून येत नाही.

धुळे तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आमदार कुणाल पाटीलांचे उल्लेखनीय कार्य बघायला मिळत असते.कुठल्यान कुठल्या मार्गाने आमदार कुणाल पाटील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम करत असतात. आमदार कुणाल पाटील विधानभवनात असतांना त्यांच्या पत्नी देखील महिलादिनी अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या होत्या.तर आमदार कुणाल पाटीलांनी विधानसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.आमदार कुणाल पाटीलांना तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजत असतील जाणवत असतील तर मग शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न येथील जबाबदार नेते मंडळींना समजत नसतील का किंवा जाणवत नसतील का? असा प्रश्न उपस्थित होतो.

शिरपूर तालुक्यात अंदाजे 80 टक्के शेतकरी वर्ग असल्याने शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे.गेल्या दोन तीन महिन्यात तालुक्यातील शेतकऱ्यांवर अनेक मोठे संकट निर्माण झाली.मायबाप शेतकऱ्यांनी कधी महावितरण कार्यालय गाठले तर कधी पोलीस स्टेशनच्या हेलपाटे मारले काहींनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले तर वृध्द शेतकरी महिलेने कर्जमाफीसाठी उपोषण केले.यादरम्यान शेतकऱ्यांसोबत नगरसेवक हेमंत पाटील,डॉ.सरोज पाटील व शेतकरी फाऊंडेशनचे मोहन पाटील,गोपाल राजपूत, हेमराज राजपूत वगळता कुठलेही नेतेमंडळी दिसून आले नाही.

तालुक्यातील माय बाप शेतकऱ्यांसाठी सर्व राजकारण दुर ठेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.आमदार कुणाल पाटिल त्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी कुठल्याना कुठल्या प्रकारे कार्य करत असतील तर शिरपूर तालुक्यातील जबाबदार नेते मंडळींनी देखील शेतकऱ्यांसाठी लढणे महत्वाचे आहे.कारण आपण आपला देश कृषी प्रधान देश म्हणून सर्वत्र सांगत असतो.त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे आपला नैतिक अधिकार आहे.
