
बातमी कट्टा:- महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 15 जून 2022 रोजी मंत्रालयात शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत बैठक झाली.
यावेळी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल, संचालक के. डी. पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, डॉ. जितेंद्र ठाकूर यांची या वेळी संयुक्त बैठक झाली.

या बैठकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, जिल्हा बँकेचे सीईओ धीरज चौधरी यांनी बँकेच्या कर्ज बाबत सविस्तर माहिती देऊन साखर कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली.तसेच साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील,व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, संचालक के. डी. पाटील यांनी देखील कारखान्याच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यात प्रॉव्हिडंट फंड देणे, धुळे जिल्हा बँकेचे कर्ज, सरकारी देणे, इतर अडचणींची माहिती या वेळी दिली.त्यात प्रामुख्याने साखर कारखाना बंद असल्यामुळे साखर कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी खर्च, इतर कर्मचारी खर्च, न्यायालयीन खर्च, हा सर्व खर्च माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व संचालक मंडळ हे खाजगी स्वरूपात करीत आहेत. आमदार अमरिशभाई पटेल व संचालक मंडळ साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी चर्चा मंत्री महोदय पाटील यांच्यासोबत करण्यात आली.

मंत्री महोदयांनी त्यांना दोन वेळा थांबवले आणि कारखान्याच्या संचालक मंडळासह बँकेचे अध्यक्ष यांची भूमिका साखर कारखाना सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत, हे त्यांनी लक्षात आणून दिले. तसेच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून चर्चा केली.
साखर आयुक्तांनी सांगितले की, या कारखान्याचे केंद्रिय निबंधक नवी दिल्ली हे असून कारखान्याचे कामकाज बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 नुसार व निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय सहकार निबंधक यांना आहेत. त्यात त्यांनी डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या पत्र बाबत लक्षात आणून दिले की, डॉ. ठाकूर यांनी जे पत्र दिले आहे त्यात अवसायक कारखाना असे लिहिले असून प्रशासक नेमण्यात यावा असे म्हटले आहे. हा विषय आपल्या अखत्यारीत येत नाही.कारखाना व बँक संचालक मंडळ कारखाना सुरू करण्याच्या भूमिकेत असून त्यासाठी कारखाना चेअरमन व संचालक मंडळ यांनी केंद्रीय निबंधकांकडे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी 17.9.2021 रोजी ठराव पाठवला आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे देखील सहकार्य आहे. मंत्री महोदयांच्या असे लक्षात आले की, जिल्हा बँक व कारखान्याचे संचालक मंडळाची सकारात्मक भूमिका आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या पत्रावर टिप्पणी दिली की, साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, याच अनुषंगाने जिल्हा या सर्व बाबींचा उल्लेख करून केंद्रीय निबंधक यांच्या कडे मागणी करावी. तसेच मंत्री महोदय यांनी सांगितले की, कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवावी.
शेवटी चेअरमन माधवराव पाटील यांनी सांगितले की, साखर कारखाना विविध अडचणींना सामोरा जात असून आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली साखर कारखाना भाडेतत्त्वावर देऊन सुरू करण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन, साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ यांनी मंत्री महोदय बाळासाहेब पाटील यांना विनंती केली की, साखर कारखाना संचालक मंडळाने केंद्रीय निबंधकाकडे भाडेतत्त्वावर मागितलेल्या परवानगीबाबत आपणही केंद्राकडे लक्ष घालून या कामी मदत करावी.
यावेळी चेअरमन माधवराव पाटील म्हणाले की, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासाठी साखर कारखाना इतरांपेक्षा नेहमीच जास्तीचा जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला असून त्यांच्या प्रयत्नाने केंद्रीय निबंधकांकडे 17 सप्टेंबर 2021 रोजी यापूर्वीच साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरु होण्या बाबत ठराव पाठवला आहे. खा. डॉ. हिनाताई गावित, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा हे सातत्याने या कामी पाठपुरावा करीत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखाना आम्ही ताब्यात घेतला होता हे जगजाहीर आहेच. आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेव्हा यापूर्वीच्या अनेकांनी कारखाना आर्थिक डबघाईला आणला होता. कारखाना समोरील अनेक आर्थिक अडथळे पार करण्याचे आम्ही प्रयत्न केले. कारखान्या समोरील अनेक आर्थिक संकटे दूर करण्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल हे आधीपासूनच प्रयत्नशील होते. परंतु कारखान्याच्या कर्जाचा विषय हा खूप मोठा यक्ष प्रश्न असल्याने यातील समस्या केंद्र शासना कडूनच सोडवल्या जाऊ शकतात असेही चेअरमन माधवराव पाटील म्हणाले.