
बातमी कट्टा:- शिरपूर भूमि अभिलेख कार्यालयाच्या सुस्त व भोंगळ कारभारावर आमदार अमरिशभाई पटेल कडाडले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला. भूमि उप-अधीक्षक बाबड यांच्या वर प्रश्नांची सरबत्ती झाली. भाईंनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

सर्वसामान्य नागरिक अनेक महिने, वर्षानुवर्ष भूमि अभिलेख कार्यालयाच्या फेऱ्या मारून अक्षरशः कंटाळले आहेत, चिडले आहेत.अधिकारी व कर्मचारी जागेवर राहत नाहीत. अनेकदा सर्व कर्मचारी कधीच कार्यालयात आढळून येत नाहीत. साहेब साईटवर गेले आहेत, साहेब मोजणीला गेले आहेत, अशी बेजबाबदारपणाची उत्तरे वारंवार सर्वसामान्य नागरिकांना ऐकायला मिळतात.
दलालांचे पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याची चर्चा कानावर पडते. एकाचे प्लॉट, जागा दुसऱ्याच्या नावावर झाल्याच्या अनेक तक्रारी देखील कधी पासून समोर येत आहेत.
शिरपूर भूमि अभिलेख कार्यालयाबाबत असंख्य मुद्द्यांबाबत तक्रारी आल्यावर आमदार अमरिशभाई पटेल हे स्वतः 5 सप्टेंबर 2023 रोजी 11:15 वाजता शिरपूर स्थित भूमि अभिलेख कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी अभियान यशस्वीपणे राबविल्याबाबत जाहीर केले असले तरी भूमि अभिलेख कार्यालय शासनाच्या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवत असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. शासनामार्फत सर्व खाते कार्यालय तातडीने दाखले देत असताना भूमि अभिलेख मात्र झोपेचे सोंग घेत आहे असे सांगून भाईंनी प्रचंड संताप व्यक्त केला. पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत हा तर अलिखित नियम झाला आहे.
तसेच इतर ठिकाणचा चार्ज असल्याने अधिकारी उप अधीक्षक हे शिरपूर कार्यालयात दोनच दिवस थांबतात. हजर रहायचे दोन दिवसांचे बोर्ड आजच्या आज लावायचे तसेच थंब मशीन तातडीने लावण्या बाबत सूचना भाईंनी दिल्या.
भाईंनी अधिकाऱ्यांच्या देखील समस्या ऐकून घेतल्या. परंतु, यापुढे सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही तक्रार ऐकून घेणार नसल्याचे त्यांनी कडक शब्दात सुनावले. अधिकाऱ्यांनी देखील यापुढे एकही तक्रार ऐकायला मिळणार नाही याची हमी व आश्वासन दिले.
यावेळी प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनीही जातीने लक्ष घालावे अशा कडक सूचनाच आमदार अमरिशभाई पटेल यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.