अवैध वाळू,मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरांवर कारवाई,

दोंडाईचा शहरासह परिसरात अवैध गौण खनिजची मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतूक केल्याची सर्वदूर ओरळ आहे. दहा दिवसा आधी दोंडाईचा अप्पर तहसीलदार पदाचा कारभार आशा गांगुर्डे याच्यांकडे सोपविण्यात आला आहे. परिसरातील अवैध गौण खनिज कारवाईचे आदेश तलाठी यांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास टाकरखेडा, मांडळ ता. शिंदखेडा शिवारातून तापी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. तर खर्दे-मांडळ रस्त्यावर अवैध मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे मिळून एकूण दोन ट्रॅक्टर तलाठी पथकाने कारवाई करत पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून शहरासह परिसरात नदी, नाल्यातून अवैधरित्या वाळू, डबर, मुरुम आदी गौण खनिजची चोरटी वाहतूक होत असल्याची ओरळ सर्वदूर आहे. नुकताच अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी दहा दिवसांपूर्वी दोंडाईचा अप्पर तहसीलदार पदाचा कारभार हाती घेतला असून दहा दिवसापासून सखोल अभ्यास करून तलाठी यांना अवैध गौण खनिजची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार तलाठी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे टाकरखेडा तापी नदी पात्रात हिरव्या रंगाचे एम एच 18 ए एन 0929 क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करतांना आढळून आले. त्यावेळी तलाठी पोलीस ठाण्यात जमा करत 1लाख बावीस हजार रुपये दंड करण्यात आले आहे. तर त्याच दरम्यान खर्दे- मांडळ रस्त्यावर अवैधरित्या मुरूम वाहतूक करतांना एम एच 18 ए एन 1922 क्रमांकचे ट्रॅक्टर आढळून आल्याने ते देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

एकाच दिवशी दोन ट्रॅक्टरवर कारवाई झाल्याने अवैध गौण खनिजची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा शहरात आहे. अप्पर तहसीलदार सौ. गांगुर्डे यांनी कारवाई सातत्य ठेवत अवैध गौण खनिजची चोरटी वाहतूक बिमोड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सदरची कारवाई शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या आदेशानुसार अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पथक संघटनेचे अध्यक्ष संजय गोसावी, विकास सिंगल, पंकज अहिराव, उष:काल मोरे, मनोहर पाटील, दिपक भगत, सुभाष कोकणी, नारायण मांजलकर, बादल जारवाल, विशाल गारे यांच्यासह आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: