बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात अवैध सावकारीचे वजन वाढले असून यात शालेय व महाविद्यालयालयीन विद्यार्थी देखील बळी ठरत असल्याचे बघायला मिळत आहे.अशाच एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांने व्याजाने घेतलेल्या पैशांतून होणाऱ्या दमदाटीमुळे आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून त्या घटनेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर शहरातील समर्थ नगर साईबाबा अपार्टमेंट जवळ मांडळ शिवारात राहणाऱ्या विनोद गोपीनाथ राठोड वय ४१ यांनी शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की फिर्यादी विनोद राठोड यांचा १७ वर्षीय मुलगा विश्वजित विनोद राठोड याने भाग्येश शेखर भावसार,शेखर ऊर्फ विश्वास भावसार,भाग्येशची आई सर्व रा.करवंद नाका ,सुयश हॉस्पिटलच्या मागे ,शिरपूर यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते.ते व्याजासह परत करावे यासाठी त्यांनी वारंवार तगादा लावला. तसेच वाढीव व्याज लावून मानसिक त्रास दिला आणि दमदाटी केली.या दमदाटीला कंटाळून मुलगा विश्वजीत याने सावळदे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस स्टेशनात तिघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादवी कलम ३०५,५०४,५०६,३४, महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३९,४५ प्रमाणे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.