
बातमी कट्टा:- भर उन्हात अचानक लागलेल्या आगीत शेतात असलेला गोठा जळुन खाक झाला.वर्षभर गुरांसाठी साठवून ठेवलेला चार,शेतातील मशागतीसाठी लागणारे साहित्य, ठिबक व खतांच्या गोण्या या आगीत जळून खाक झाले आहेत.भर उन्हाच्या व सुरु असणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.शेतकऱ्यांचा डोळ्यासमोर गोठा जळून खाक झाल्याने शेतकरी पितापुत्रांना अश्रू अनावर झाले होते.

सविस्तर वृत्त असे की,अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील यादव किसन चौधरी यांच्या मारवड रस्त्यालगत असलेल्या शेतातील गोठ्याला काल दि 4 रोजी दुपारी अचानक आग लागल्याने वर्षभरासाठी साठवून ठेवलेला गुरांचा चारा, शेतासाठी लागणारी महागडी अवजारे,ठिबक तसेच पाईप्स रासायनिक खतांच्या पिशव्या जळून पूर्णतः नष्ट झाल्या यामुळे शेतकरी यादव किसन चौधरी यांचे सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.शेतातील मेंढपाळ व सालदार यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले,मात्र भर उन्हाचा तडाखा व जोराचा वारा सुरू असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी क्षणार्धात होत्याच नव्हते झाले.डोळ्यासमोर गोठ्यातील साहित्य जळून राख होत असल्याचे चित्र पाहून, शेतकरी यादव चौधरी व त्यांचा मुलगा धनराज चौधरी यांना अश्रू अनावर झाले होते.सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही.
