
बातमी कट्टा:- राजकीय विरोधक असलेल्या आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात बोलताना जीभ घसरल्याने अपशब्द बाहेर आले असून त्याबाबत जाहीर माफी मागत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी फेसबुक लाईव्ह करून सांगितले. या घटनेनंतर मतदारांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून त्याचा कितपत परिणाम राजकीय घडामोडींवर होतो हे येत्या काळात समजणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोंडाईचा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना ललित वारुडे यांनी जयकुमार रावल यांना उद्देशून अर्वाच्य शब्दप्रयोग केला. त्याबाबत मोठा गदारोळ उठला. वारुडे यांच्यावर चौफेर टीकाही झाली. त्यामुळे त्यांनी फेसबुक लाईव्ह करीत आपला असे बोलण्याचा उद्देश नव्हता, मात्र भावनेच्या भरात नकळत तोंडातून ते शब्द सुटले अशी कारणे देऊन त्याबाबत जाहीर माफी मागत असल्याचे स्पष्ट केले.
मात्र हे करीत असतानाच त्यांनी जयकुमार रावल यांच्याशी असलेला राजकीय आणि वैचारिक विरोध हा कायम राहील हे देखील नमूद केले.ललित वारुडे यांच्या फेसबुक लाईव्हवर वेगवेगळ्या स्तरातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात काहींनी माफी मागण्याचे औदार्य दाखवल्याबद्दल वारुळे यांचे कौतुक केले, तर काहींनी असा शब्दप्रयोग जाहीर भाषणांमध्ये होतोच कसा असा प्रश्न उपस्थित केला. काही समर्थक हमरीतुमरीवर आले आहेत.
यात सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक व्यासपीठावरील घसरलेल्या भाषेच्या दर्जाचे पुन्हा एकदा प्रदर्शन यानिमित्ताने दिसून आले. पक्ष कोणताही असो, नेत्यांमधील सुसंसंस्कृतपणा संपुष्टात आला असून शिवराळ बोलल्याशिवाय दुसरे काहीच त्यांना जमत नसल्याचे वारंवार दिसून येते. दिल्लीत जे घडते तेच गल्लीतही घडू लागले की काय असे या निमित्ताने वाटू लागले आहे. विशेषतः जयंत पाटलांसारखा सुसंस्कृत म्हणून ओळखला जाणारा नेता व्यासपीठावर उपस्थित असताना असा प्रकार घडणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक आहे. आता या मुद्द्याचे राजकीय भांडवल करू नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केले जात असले तरी आधी अपशब्द आणि नंतर माफी या नाट्यातून कोणता राजकीय संदेश जातो आणि त्याचा अर्थ मतदार कसा काढतात हे लवकरच दिसून येणार आहे.