आपण देखील क्रिकेट प्रेमी आहात का ? मग वाचा क्रिकेट समालोचक गोकुळसिंह गिरासे यांच्या लेखणीतील “अंतिम सामना” !

बातमी कट्टा:- दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दैदिप्यमान कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती .ज्या पद्धतीने भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून कामगिरी केली, ती खरोखर वाखाण्यासारखी होती .भारतीय संघाकडून संपूर्ण क्रिकेट जगताला अपेक्षा होत्या की, भारतीय संघ या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आपले नाव कोरेल !  पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे कुणीही मोठ्या दाव्याने सांगू शकत नाही ,की पुढे काय घडणार  !! पण ज्या पद्धतीने भारतीय संघ एकसंघ होऊन खेळत होता, ते बघितल्यावर वाटत होतं की ,भारतीय संघ यावर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आपले अधिराज्य गाजवणार !!! खऱ्या अर्थाने भारतीय संघाने अधिराज्य गाजवले देखील ! केवळ अंतिम सामन्यात भारतीय संघ काहीसा अडचणीत दिसला. पण याचा अर्थ खेळाडूंची कामगिरी खालावली असे नाही .काही खेळाडूंनी नक्कीच त्यांच्या नावाला साजेसा खेळ केला नसेल ! पण याचा अर्थ असा नाही की , केवळ एका सामन्यावरून आपण त्यांना वाईट बोलावे .खरोखर भारतीय क्रिकेट चाहत्यांचे कौतुक करावेसे वाटते की, ज्या पद्धतीने त्यांनी अंतिम सामन्यातील पराभव स्वीकारला ते देखील कौतुकास्पद आहे.

              भारतीय खेळाडूंची अंतिम सामन्यातील देहबोली जास्त सकारात्मक वाटत नव्हती ! पण कदाचित ती केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध असलेल्या सामन्यामुळे !! कारण बऱ्याचदा विरुद्ध संघ कुठला आहे , त्यानुसार प्रत्येक संघाची देहबोली बदलत असते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना ( केवळ अंतिम सामन्यात किंवा नाँकआउट सामन्यांमध्ये ) भारतीय संघाला थोडासा मानसिक दबाव येत असावा ? यापूर्वी देखील विश्वचषक २००३  च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला होता , त्यामुळे काहीसा मानसिक दबाव हा आपल्या खेळाडूंवर या अंतिम सामन्या दरम्यान आला असावा ? आपण कितीही विचार केला तरी मनुष्यप्राणी हा असाच असतो. त्याच्या मनात कुठेतरी ती नकारात्मकता  येत असते . तरी देखील संकटांचा सामना करत भारतीय संघाने चांगल्या प्रकारे सामन्यावर पकड बनवण्याचा प्रयत्न केला , पण तो पुरेसा ठरला नाही! भारतीय कर्णधार रोहित शर्मा ने  चांगल्या प्रकारचे नेतृत्व केले. त्याला विराट कोहलीचे योग्य असे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले . सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ यापूर्वी कधीही एवढा एकसंघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान दिसला नव्हता !

                खरे पाहता अंतिम सामन्यात खेळपट्टीने देखील आपला रंग दाखवला. सुरुवातीला भारतीय फलंदाज फलंदाजी करत असताना चेंडू फारसे बॅटवर येत नव्हते. नंतर मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असतांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बऱ्यापैकी चेंडू बॅटवर येताना दिसत होता . भारतीय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक लक्षात येईल की ,या सामन्यात भारतीय खेळाडूंचे क्षेत्ररक्षण तेवढ्या उच्च दर्ज्याचे नव्हते जेवढे ते प्रत्येक सामन्यात ठेवत होते. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, ऑस्ट्रेलियाने आपले क्षेत्ररक्षण हे नेहमीप्रमाणेच ठेवले. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन खेळाडू क्षेत्ररक्षण करत होते ते बघितल्यावर वाटत होतं की ,ते प्रत्येक चेंडूला फार महत्त्व देत होते. आपल्या खेळाडूंनी जर क्षेत्ररक्षणा दरम्यान जास्त सकारात्मकता दाखवली असती , तर सामन्याचे चित्र थोडेसे वेगळे दिसले असते ! ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक हे प्रत्येक धाव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना नेहमीच त्यात यश मिळत असते आणि या अंतिम सामन्यात तर त्यांनी कमालच केली जवळजवळ प्रत्येकच चेंडू त्यांनी रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

              ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप चांगले खेळले याचा अर्थ भारतीय खेळाडू खराब खेळले असे नाही .आपल्या खेळाडूंनी १००% योगदान देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश आले नाही. तेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी किंवा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश मिळाले, म्हणून हा एक मोठा फरक दोन्ही संघांच्या दरम्यान अंतिम सामन्या दरम्यान दिसला. पण ज्या पद्धतीने भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान कामगिरी केली ती अविस्मरणीय ठरली !

आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, भारतीय संघाने एकूण या स्पर्धेत दहा सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून देखील केवळ नऊ सामन्यांमध्ये आपला विजय नोंदवला आहे. यावरून कळते की आपला संघ किती चांगल्या प्रकारे सातत्यपूर्ण खेळत होता .फरक केवळ एवढाच झाला की अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली बाजू सरशी केली .

              या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारतीय फलंदाज ,गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षक सर्वांनी चांगली कामगिरी केली. पण सर्वात जास्त कौतुक मला आता करावसं वाटतंय ते भारतीय प्रेक्षकांचे ! ज्या पद्धतीने ते भारतीय संघाच्या पाठीशी उभे आहेत .संपूर्ण देशातील लोकं भारतीय क्रिकेट संघाच्या पाठीशी उभे आहेत, हे बघून खूप आनंद होत आहे .प्रेक्षकांनी कुठल्याही माध्यमातून भारतीय संघातील खेळाडूंना दोषी धरलेले नाही .या गोष्टीचा आनंद वाटतोय. आपल्या देशातील प्रेक्षक खूप परिपक्व आणि सकारात्मक मानसिकता असलेले आहेत .हे या गोष्टीवरून निदर्शनास येते. पण ज्या पद्धतीने भारतीय संघाने संपूर्ण क्रिकेट स्पर्धेदरम्यान आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली होती ,त्याचा आनंद अनेक वर्षांपर्यंत लोकांना राहील .केवळ  अंतिम सामन्यातील पराभव क्रिकेट प्रेमींना काहीसा नाराज करून गेला. भारतीय संघ अंतिम सामन्यात विजयी होऊ शकला नाही ,या गोष्टीची खंत वाटते .पण यापुढे देखील भारतीय संघाच्या पाठीशी संपूर्ण क्रिकेट चाहते आणि देशातील सर्वसामान्य जनता नेहमीच उभी राहावी हीच क्रीडाप्रेमी म्हणून इच्छा !! भारतातील वरिष्ठ खेळाडूंनी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि नवोदितांना मार्गदर्शन केले ! आता नवोदित खेळाडूंनी येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी आपले जास्तीत जास्त चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करावा  हीच इच्छा !! भारतीय क्रिकेट संघाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! 

डॉ गोकुलसिंह गिरासे,क्रिकेट समालोचक ९५९४९७७५७७

Email [email protected]

WhatsApp
Follow by Email
error: