आमदार साहेब जेव्हा शेतकरी रडत होता, तेव्हा कुणी आलं नाही! सोशल मीडियावर रील नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम हवे

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे काही शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात राहणार आहे. दहा दिवस झाले तरी शेतकऱ्यांना ना शासनाची मदत मिळाली, ना कोणी त्यांच्या हक्काची विचारपूस केली. अशा परिस्थितीत नुकसानीच्या आठ दहा दिवसांनतर नुकतेच आमदार साहेबांनी नुकसानीग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकरी वर्गाने आमदारांच्या या भेटीबद्दल आभार मानले, पण मनात एकच प्रश्न दाटून आला तो म्हणजे आमदार साहेब इतका उशीर का झाला ?

त्या पावसाच्या रात्री जेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले, तेव्हा आमदार साहेब कुठे होते? त्या वेळी शेतकऱ्यांना मानसिक आधाराची, दिलास्याची गरज होती. पण कोणी विचारपूस करायला आलं नाही. आता नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अचानक भावना जागृत झाल्या, हे शेतकऱ्यांना समजत नाही.

आज जेव्हा सोशल मीडियावर पाहणीचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स व्हायरल होत आहेत, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात मिश्र भावना आहेत. एकीकडे त्यांच्या शेतात लोकप्रतिनिधी येऊन पाहणी करत आहेत, हे समाधान आहे, पण दुसरीकडे प्रश्न कायम आहे जेव्हा आमचं सर्व वाया गेलं तेव्हा कुठे होतात तुम्ही ?इतर तालुक्यांतील काही आमदारांनी पावसानंतर लगेच शेतात जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला, शेतकऱ्यांना धीर दिला, अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण शिरपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र गप्प राहिले. इतर कार्यक्रमांसाठी वेळ मिळतो, पण शेतकऱ्यांसाठी का नाही, हा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

शासनाच्या योजना आणि आश्वासने फक्त कागदावर दिसतात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँकेतील हप्ते थांबलेले नाहीत, वीजबिलं येतच आहेत, मुलांच्या शाळेच्या फी बाकी आहेत. या सगळ्या संकटात शेतकरी आजही आशेच्या नजरेने आपल्या लोकप्रतिनिधीकडे पाहत आहे.

“मायबाप शेतकऱ्यांचा वाली कोण?” हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून राहिला आहे. आमदार साहेबांची पाहणी ही केवळ औपचारिकता ठरू नये, तर प्रत्यक्ष मदत, भरपाई, आणि शेतकऱ्यांच्या अडचणींना न्याय मिळवून देण्याचे ठोस पाऊल उचलले पाहिजे, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे. सोशल मिडीयावर आलेला रिडल्स वरुन समजते शेतकऱ्यांसाठी उशीरा का होईना पण ते आमदार साहेब शेताच्या बांधापर्यंत पोहचले‌.

WhatsApp
Follow by Email
error: