बातमी कट्टा:- शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्वोच्च मंडळ सिनेट वर, प्राचार्य मतदार संघातून निवडून आले आहेत. तसेच आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय. एम. आर. डी. परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांची महिला प्राचार्य मतदार संघातून बिनविरोध निवड झाली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटांमधून निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ चे कलम २८ (२) (ण) नुसार प्राचार्यांच्या गटामधून सिनेटवर १० सदस्यांची निवड केली जाते. दि. ८ जानेवारी २०२३ रोजी अधिसभेची निवडणूक विद्यापीठामार्फत घेण्यात आली. त्यात प्राचार्य (अनारक्षित) गटातून प्राचार्य डॉ. संजय सुराणा निवडून आले तर महिला प्राचार्य गटातुन डॉ. वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली.
त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, सर्व संचालक, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.