बातमी कट्टा:- राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाना दिल्या जाणार्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला असून यासाठी राज्याच्या अधिवेशनात तसेच आरोग्य विभागाकडे सतत पाटपुरावा केला होता.त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती देतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक झाली या बैठकित विविध विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. त्यात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेण्यात आला. राज्यात एकूण 70 हजार आशा स्वयंसेविका आणि 3 हजार 500पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत.यासाठी आ.कुणाल पाटील यांनी वारंवार राज्याच्या होणार्या विविध अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. ग्रामीण भागात घरोघरी आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करीत असतात. ग्रामीण भागात गरोदर मातांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेवून जाणे,लसीकरण करणे, आरोग्य सर्व्हेक्षण करणे, साथीच्या रोगांची माहिती देत जनजागृती करणे अशी कामे त्यांना करावी लागतात. तसेच कोरोनासारख्या महाभयानक आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी खर्या अर्थाने जीवाची पर्वा न करता कोरोनायोध्दा म्हणून भूमिका पार पाडली आहे.त्या बदल्यात त्यांना अत्यल्प मोबदला दिला जातो.त्यामुळे सदर मोबदल्यात वाढ करावी अशी मागणी वारंवार लावून धरली होती. तसेच आ.कुणाल पाटील यांना आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने निवेदनही देण्यात आले होते. त्यामुळे आ.पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करुन मोबदला वाढीबाबत मागणी केली होती. आज दि. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकित आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचा मोबदला वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी माहिती दिली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेसोबतच सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असते. त्यामुळ आ.कुणाल पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.