बातमी कट्टा:- महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली शिरपूर येथे 2 एप्रिल 2023 रोजी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने “स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रा” काढण्यात येणार असून शिरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली शिरपूर येथे स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रा 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील चोपडा जीन पासून मेन रोड, विजय स्तंभ पर्यंत काढण्यात येणार असून भाजपा कार्यालया समोर समारोप करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या बाबत केलेल्या अनुद्गार बद्दल निषेध करण्यात येऊन 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार कार्यालय, करवंद रोड येथे पत्रकार परिषदेत गौरव रथयात्रेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, सुभाष कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेनेचे मनोज धनगर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, दिनेश गुरव, पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी आ. काशिराम पावरा म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना यांच्या वतीने गौरव यात्रा
30 मार्च पासून गौरव यात्रा काढण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान असून ते देशभक्त होते. विर सावरकर यांच्या बद्दल कोणीही अपमान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. गौरव रथयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ. काशिराम पावरा यांनी यावेळी केले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून त्यांचा अपमान करणे हे निषेधार्थ आहे. विर सावरकर यांच्या सन्मानार्थ सर्वांनी गौरव रथयात्रेत सहभागी व्हावे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध भाजपातर्फे सर्वत्र करण्यात येत आहे.
सुभाष कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्राभिमानी होते. सावरकर हे घराघरात पोहचण्यासाठी हा प्रयत्न असून नव्या पिढीला सावरकर समजावे, समाजा पर्यंत सावरकर पोहचावा हा देखील उद्देश आहे. त्यांचे उदात्त साहित्ये उपलब्ध आहे, अनेक शब्द भांडार, शब्द कोष सावरकर यांनी महाराष्ट्राला व देशाला दिले आहे. तालुक्यातील विविध पदाधिकारी, सर्व नागरिक, हिंदू देशभक्त यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. आभार पत्रकार किशोर माळी यांनी मानले.