बातमी कट्टा:- तापी परिसरातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेले बाळदे तिर्थक्षेत्रात आषाढी एकादशीला प्रत्यक्ष पंढरपूरच अवतरल्याचा अभास होतो.तापी परिसरातील लाखोच्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे दाखल होतात.नवसाला पावणारे दैवत जिल्ह्यात या तिर्थस्थळाची ओळख आहे.आज दि 10 रोजी आषाढी एकादशीनिमित्त याठिकाणी यात्रोत्सव होत आहे.
मंदिराची स्थापना:-
1983 साली मोठेबाबा म्हणून विठ्ठल बुवा चौधरी आणी नथुसिंग बाबा यांच्या कारकीर्दीत बाळदे येथील मंदिराची स्थापना झाली.पंढरपूरच्या पांडुरंगाचा साक्षात्कार ज्या घराण्याला आला ते भगवान बुवा बडवे बाबा यांच्या हस्ते मंदिराचे उदघाटन करण्यात आले.1983 पासून रोज नित्यनियम प्रमाणे पहाटे व सायंकाळी आरती,हरिपाठ व एकादशीच्या दिवशी किर्तन होते.जानेवारी महिन्यात म्हणजेच पौषवैद्यवटीला प्राणप्रतिष्ठा साजरी केली जाते.त्याच दिवशी गावातील व परिसरातील नागरिकांना भंडारा दिला जातो.सप्ताहाचे नियोजन करण्यात येते.
मंदिर ट्रस्टचे उपक्रम :-
मंदिराच्या ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात.मंदिराजवळ धर्मशाळा, संताना राहण्यासाठी निवास आहे. विठ्ठलांच्या साक्षीने विविध समाजाच्या जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळा येथे करण्यात आला होता.मंदिर परिसरात कूपनलिका ,पाण्याची टाकी,व गटारी विकासकामे करण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह ,नवीन पाण्याची टाकी व भक्त निवास उभारण्यात येणार आहे.या तिर्थस्थळासाठी 20 लाख निधी आमदारांनी उपलब्ध केला होता.या निधीतून मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले.
प्रतिपंढरपूर बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या यात्रेत दोन लाखांपेक्षा जास्त भाविक हजेरी लावतात.ग्रामीण भागातून आलेल्या वारकऱ्यांची देखील मोठी गर्दी असते.50 दिंडी दरवर्षी याठिकाणी येत असतात.संतसेना महाराज,संत नामदेव महाराज,संत रोहिदास महाराज,संत नरहरी सोनार यांच्या चार ते पाच दिंड्यांना नव्याने येथे सुरुवात झाली होती.टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलांच्या जयघोष करत दिंड्या येत असतात.यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनातर्फे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत.
स्वयंसेवकांची मोफत सेवा
श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन मुंबई व सलग्न उपासना केंद्र शिरपूर द्वारे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून याठिकाणी क्राऊड कंट्रोलच्या सेवा देण्यात येत आहे. यया केंद्राचे 200 स्वयंसेवक भाविकांना निशुल्क सेवा देत असतात.आज देखील केंद्रातर्फे सेवा देण्यात येत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवात विविध भागातील भाविक याठिकाणी हजेरी लावतात.यात्रेत हॉटेल्स, फोटो विक्री, रसवंती, मनोरंजनाची साधने यातून जवळपास 50 ते 60 लाख रुपयांची उलाढाल होते.
वाहतूकीचे नियोजन
बाळदे येथे यात्रेनिमित्त भाविक विविध वाहनांवरुन येत असतात.यासाठी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी शिरपूर बसस्थानकातून जादा बससे सोडण्यात येणार आहे.यात्रोत्सवासाठी संस्थानाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील सचिव निंबा पाटील व संचलकांनी संयोजन केले आहे.