बातमी कट्टा:-फ्लिपकार्टचे बनावट ग्राहक दाखवून दोन जणांनी २७ लाख ६५ हजार ७३० रूपयांचा गंडा घातल्याची घटना घडली असून शिरपूर येथील दोन डिलीव्हरी बॉईजविरोधात कंपनीचे कायदेशीर कार्यकारी अधिकारी यांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एन्टेक्स ट्रान्सपोर्ट सर्विसेस प्रा.लि कंपनीचे मुख्य कार्यालय पुणेचे लिगल कार्यकारी अधिकारी मयूर शिंदे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की एन्टेक्स ट्रान्सपोर्ट सर्विसेस प्रा.लि कंपनीतर्फे प्रवीण भास्कर बाविस्कर रा.गोरव हॉटेलच्या मागे शिरपूर यांंची शिरपूरात डिलीव्हरी सर्विसेस पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.त्यांच्या सोबत विवेक नामदेव कोळी रा.खामखेडा ता.शिरपूर काम करत होता.शिरपूर शहर व तालुक्यात कंपनीचे पार्सल घरपोच देण्यासाठी माल गोडावून मधुन घेवून ग्राहकांपर्यंत पोहचविणे व पैसे कंपनीचे खात्यात जमा करण्यासाठी प्रविण भास्कर बाविस्कर हा व त्याचा पार्टनर म्हणून विवेक कोळी काम सांभाळत होते.
जुन २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान प्रविण बाविस्कर व विवेक कोळी यांनी फ्लिपकार्ट ब्रँड चा वापर करुन ग्राहकांच्या नावे बोगस आय.डी तयार करुन त्या वस्तूंची विल्हेवाट लावुन पैसे कंपनीच्या खात्यावर जमा केले नाही. तसेच आलेला माल ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्याचे संगणकावर दाखवून व सदर माल कंपनीस परत केल्याबाबत खोटा बग आय.ड संगणकावर दाखवून सदरचा माल व पैसेही कंपनीस परत केले नाही.कंपनीने हिशोब केल्यानंतर कंपनीच्या लक्षात आले की प्रविण बाविस्कर व विवेक कोळी याने कंपनीच्या खात्यात जमा करावयाची रक्कम २७ लाख ६५ हजार ७६० रूपये कंपनीस जमा केले नाही.याप्रकरणी प्रविण बाविस्कर व विवेक कोळी या दोघांविरुध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशनात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.