बातमी कट्टा:- धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर दि. 20 सप्टेंबर रोजी अभियांत्रिकी प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा झाली. त्यात काही केंद्रांवर संगणकीय तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले. अशा विद्यार्थ्यांना फेर परीक्षेला बसण्याची संधी द्यावी अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना आ. कुणाल पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे तातडीने ई-मेल पाठवून झालेल्या तांत्रिक अडचणीबाबत कळवले असून आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे की, दि. 20 सप्टेंबर रोजी होणा-या एमएचटी- सीइटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून अभ्यास केला होता. ही परीक्षा वर्षभरातून एकदाच होत असल्याने विद्यार्थ्यांचे या परीक्षेवर शैक्षणिक भवितव्य अवलंबून असते. दि. 20 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर संगणकावर ऑनलाईन पेपर देण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीपासूनच अनेक विद्यार्थ्यांना संगणकाच्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. संगणकावर ऑनलाइन परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना एका विषयाचे प्रश्न दिसायचे तर दुसऱ्या विषयाचे प्रश्नच दिसले नाहीत. त्यामुळे त्यांना पूर्ण प्रश्न सोडवता आले नाही, तसेच संगणकावर स्क्रीन पूर्ण वाईट होणे, पूर्ण सूचना न दिसणे अशा तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांनी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांना आलेल्या अडचणी सांगितल्या मात्र त्या अडचणी सोडविण्यास निरीक्षकही असमर्थ ठरले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन झालेल्या गोंधळाबाबत लेखी तक्रारही केली आहे. म्हणून परीक्षा देत असताना संगणकाच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना हे फेरपरीक्षाची संधी द्यावी अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली आहे.