बातमी कट्टा:- धुळे ते सडगाव बस सेवा धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे नियमितपणे सुरू करण्यात आली आहे. बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी पत्राद्वारे सूचना केली होती. ऐन सणासुदीच्या दिवसात बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून धुळे ते सडगाव ही बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. धुळे शहरात रोजगारासाठी जाणारे कामगार, विविध शेतीपयोगी कामासाठी जाणारे शेतकरी, तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची गेल्या अनेक दिवसापासून ही बस नसल्याने तारांबळ उडत होती. परिणामी त्यांना वैयक्तिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. सदर बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
त्यानुसार आमदार कुणाल पाटील यांनी बससेवा सुरू करण्याबाबतचे पत्र देऊन तातडीने बस सेवा सुरू करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने यासाठी वारंवार पाठपुरावा करून गणेश गर्दे आणि शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक श्रीमती मनीषा सपकाळ यांची भेट घेतली. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून शाळा महाविद्यालेही सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच प्रवाशांची गैरसोय होत आहे म्हणून धुळे ते सडगाव ही बस सेवा सुरू करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांनी यावेळी केली. त्यानुसार तातडीने दखल घेत धुळे ते सडगाव ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सदर बस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.