
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बाळदे गावातील रहिवासी व कृषी सहाय्यक असलेले प्रभाकर तुळशीराम पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ जुलै रोजी घडली होती.त्यांचा मृतदेह जातोडे शिवारातील शेतात आढळून आला होता.याबाबत आता आत्महत्यास प्रवृत केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्वताच्या शेतात प्रभाकर पाटील यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांच्या पत्नी गायत्री पाटील यांनी शहर पोलिस स्टेशनात दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत प्रभाकर पाटील यांनी संजय राधेश्याम शर्मा यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते व हे कर्ज थकले होते. त्याची परतफेड न होवू शकल्याने संशयित संजय शर्मा आणि अभिजित देसले यांनी प्रभाकर पाटील यांना आकाश गार्डन हॉटेलसमोरची तीन मजली इमारत नावावर करुन देण्यास सांगितली होती.त्यांनी दोघांच्या नावावर ती इमारत करुन घेतली होती.एकूण ५० लाख रुपयांत हा व्यवहार ठरला होता.मात्र संजय शर्मा यांनी आपल्या घेण्यापैकी नऊ लाख ५० हजार रुपये या व्यवहारातून काढून घेतले.त्यानंतर उर्वरित ३९ लाख ५० हजार रुपये देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरु केली.प्रभाकर पाटील यांनी तगादा लावल्यानंतर दोघांनी त्यांना मारुन फेकून देण्याची धमकीही दिली होती.
त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या केल्याचा संशय गायत्री पाटील यांनी फिर्यादीत व्यक्त केला. त्यावरुन संशयित संजय शर्मा व अभिजित देसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शर्मा याला अटक करण्यात आली आहे.