बातमी कट्टा:- धुळे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सूचनेनुसार दह्याणे शिवारात के.टी.वेअर तसेच बंधाऱ्यांचा आराखडा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे दह्याणे येथील शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी या हेतूने आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यात विविध ठिकाणी के.टी.वेअर तसेच साठवण बंधाऱ्याचा बांधकाम आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दह्याणे ता. धुळे येथे नुकतेच सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
आमदार कुणाल पाटील यांच्या सूचनेवरून धुळे जलसंधारण विभागाच्यावतीने दह्याणे येथे जाऊन साठवण बंधाऱ्याच्या बांधकामासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक व जेष्ठ नेते अशोक राजपूत, पितांबर पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. माहिती देताना ज्येष्ठ नेते अशोक राजपूत यांनी सांगितले की, माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रयत्नातून दह्याणे शिवारात धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे दह्याणे परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची शेती बागायती झाली आहे. त्याच अनुषंगाने आमदार कुणाल पाटील यांच्या दूरदृष्टीतून आमच्या भागात बंधाऱ्यांचे बांधकाम होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान बंधाऱ्याच्या बांधकामानंतर दह्याणे,बल्हाणे,रावेर या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आमदार कुणाल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.