बातमी कट्टा:- गेल्या चौदा महिन्यांपासून कोरोनाचे संकट आपल्या देशावर आलेले आहे. या संकटात अनेक क्षेत्र बाधित झालेले आहेत ,किंवा अनेक क्षेत्रांची गाडी आपल्या रूळावरून खाली उतरलेली आहे ,त्यापैकीच एक क्रीडा क्षेत्र देखील आहे .क्रीडा क्षेत्रात काम करणारे वेगवेगळे घटक या कोरोना च्या संकटामुळे चांगल्याच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. जसे इतर अनेक लोक आपला व्यवसाय बदलताना दिसत आहेत, म्हणजेच जे अत्यावश्यक किंवा जीवनावश्यक वस्तूंशी निगडीत व्यवसाय आहेत त्या व्यवसायात लोकं उतरत आहेत अगदी तसेच क्रीडा क्षेत्रातील काही लोक यात आता उतरायच्या विचारात आहेत .कारण क्रीडा क्षेत्र संपूर्णपणे ठप्प पडलेले आहे .त्यात अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने ,वेगवेगळ्या रुपाने आपले योगदान देत असतात आणि आपली उपजीविका भागवत असतात किंवा आपला संसार चालवत असतात. तसेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी ते अग्रेसर असतात .

जर आपण कुठल्याही खेळाचे उदाहरण घेतले, तर आपल्याला लक्षात येईल की ,त्यात खेळाडूंच्या व्यतिरिक्त देखील असे अनेक घटक असतात जे खूपच महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात .जसे की त्या खेळाचे प्रशिक्षक, सह प्रशिक्षक, पंच ,गुणलेखक, सांख्यिकी तज्ञ, समालोचक, तसेच मैदान तयार करणारे क्युरेटर, ग्राउंडस्मन किंवा सपोर्टिंग स्टाफ असे अनेक घटक असतात किंवा त्या सामन्यांचं प्रसारण करण्यासाठी छोटे छोटे चॅनल्स वाले, युट्युब चँनल्स वाले, अनेकदा वेगवेगळ्या खेळांच्या प्रसारणाच्या माध्यमातून आपली आणि आपल्या सोबत असलेल्या टीमची उपजीविका भागवत असतात. सध्या खालच्या स्तरापासून तर राष्ट्रीय पातळीच्या खेळांच्या स्पर्धा बंद आहेत ,म्हणून त्यांचे प्रसारण होऊ शकत नाही . हे सर्व घटक आता काहीसे बेरोजगार झालेले आहेत ,आणि म्हणूनच अशा घटकांना देखील शासनाकडून काही ना काही मदत मिळायला हवी .शासनाने केवळ इतर संघटित घटकांनाच नव्हे, तर अशा असंघटित घटकांना देखील कुठल्या ना कुठल्या रूपाने काहीतरी मदत द्यायला हवी .असे केल्याने अनेक हे छोटे-छोटे घटक आणि त्यांचे कुटुंब आपली उपजीविका चांगल्या प्रकारे भागवू शकतात. तरी शासनाने या असंघटीत घटकांना मदत करावी, हीच क्रीडाप्रेमी म्हणून इच्छा!!!
सर्वात महत्वाचे म्हणजे यातील अनेक असे घटक आहेत जे कुठेही मदतीसाठी कुणापुढेही हात पसरणार नाहीत, कारण त्यांचं एक वेगळं स्टेटस असतं आणि म्हणून त्यांना ते सांभाळणे फार गरजेचे असते. पण खरे पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती जर आपण विचार केला तर लक्षात येईल की, त्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद झालेले आहे . राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळी आहे .मग तो खेळ कुठलाही असू द्या !! पण खालच्या स्तरावर जसे तालुका पातळी ,जिल्हा पातळी, राज्य पातळीवर काम करणारे अनेक लोक असंख्य अडचणींचा सामना करत आहेत, या गोष्टीकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे!! म्हणूनच त्यांना कुठल्या ना कुठल्या रुपाने शासनाने मदत करावी हीच अपेक्षा !!!
हा कठीण काळ निघून गेल्यानंतर हे सर्व घटक आपल्याला पुन्हा एकदा, आपल्या राज्यातील आणि आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील यात काही शंका नाही!!! तरी राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने अशा सर्व घटकांकडे काही प्रमाणात का असेना लक्ष केंद्रित करावे व सर्वतोपरी मदत करावी हीच अपेक्षा!!!
डॉ.गोकुलसिंह गिरासे
क्रिकेट समालोचक
९५९४९७७५७७
Email [email protected]