बातमी कट्टा:-होणार,होणार म्हणून उत्तर महाराष्ट्रातील सर्वांना प्रतिक्षा लागुन असलेल्या खासदार हिना गावीत यांचा केंद्रीय मंत्रीमंडळातील समावेश अखेर हुसकला.अखेरच्या क्षणापर्यंत मंत्रीपदी नाव निश्चित असलेल्या खा.डॉ हिना गावीतांच्या वाटेत काटे कोणी पेरले ? याची चर्चा राजकीय क्षितिजावर आता रंगली आहे.

सलग दोनदा विक्रमी मताधिक्याने खासदारपदी निवड, पंतप्रधान उज्वला गॅस योजनेचे प्रमुख पद भुषवतांना केलेली उज्वल कामगिरी, लागोपाठ संसद रत्न म्हणून मिळवलेला बहुमान, आदिवासींमध्ये प्रचंड प्रभाव असलेल्या कुटुंबाचा वारसा अशा सर्व जमेच्या बाजु असतांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये जागा असतांनाही हीनाताईंच्या लाल दिव्याचे स्वप्न अधुरेच रहावे हा काही दैवखेळ नाही. महाराष्ट्र भाजपच्या हायकमांडकडूनच त्यांच्या मंत्रीपदाला खो घातल्याची चर्चा आहे.
2014 पासून गावीत कुटुंबाचे खान्देशातील बड्या भाजप नेत्याशी शीतयुध्द सुरु आहे. त्या दोघांमधील कलगीतुराही जनतेने अनेकदा अनुभवला. मुळातच एकमेकांविरोधात सुप्त धोरणे राबवणारे हे दोन्ही नेते प्रचंड महत्वाकांक्षी असून खान्देशच्या राजकारणावर आपलीच पकड राहावी यासाठी बरेवाईट सर्वच प्रयत्न करतांना दिसतात.
आदिवासी कोट्यातून मंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या हिना गावीतांच्या मार्गात सुरुंग पेरणाऱ्या त्या नेत्याने राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा हायकमांडकडे असलेले स्वतःचे संपूर्ण वजन वापरले असल्याची चर्चा आहे, त्यामुळे अवघ्या दोन वर्षापूर्वी भाजपमध्ये आलेल्या खासदार डॉ.भारती पवार यांची मंत्री मंडळात वर्णी लागली.या राजकारणामुळे खान्देशच्या विकासाची मोठी संधी हिरावली गेली असून डॉ गावीत समर्थकांमध्ये मोठा असंतोष जाणवून येत आहे.या पार्श्वभूमीवर डॉ.विजय कुमार गावीत व खासदार डॉ.हिना गावीत कोणती भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.