गरजू व्यक्तींना मदत केल्याचा खरा आनंद :-मेहा दिदी पटेल यांचे प्रतिपादन

झायडस लाईफसायन्स, तपन मुकेश पटेल फाउंडेशन व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, अस्तित्व यांच्या संयुक्त विद्यमाने दातृत्वपूर्ण कार्यक्रमातून असंख्य गरजूंना मदत

बातमी कट्टा: शिरपूर तालुक्यासाठी व शिरपूरकरांसाठी आ. अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल व आम्ही संपूर्ण पटेल परिवार नेहमीच सेवेसाठी तयार असून सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहोत. तपनभाई पटेल यांना जाऊन 4 वर्षे झाले. ते म्हणायचे, ज्याच्या कडे पैसा आहे त्यांना मदत करणे महत्वाचे नाही, ज्याच्या कडे पैसे व काहीच नाही त्यांना मदत करणे महत्वाचे आहे. तपनभाई आपल्यातून गेल्यावर त्यांचे महत्व समजते. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही सामाजिक कार्य जोमाने करतोय. इतरांना मदत केल्यानंतर आम्ही त्यातून फक्त आनंद शोधतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, खुशी निर्माण करणारा पटेल परिवार असून पटेल परिवार सातत्याने काम करतोय, शिरपूरकरांच्या आशीर्वाद मुळेच आम्ही हे करु शकतो असे प्रतिपादन सौ. मेहा दिदी पटेल यांनी केले.

झायडस लाईफसायन्स, तपन मुकेश पटेल फाउंडेशन आणि मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, अस्तित्व यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी स्व. तपनभाई पटेल यांच्या स्वप्नातील शिरपूर साकारण्यासाठी बहिणींनी आयोजित केलेले दातृत्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.

माजी खासदार स्व. मुकेशभाई पटेल यांच्या सुपुत्री तथा तपन मुकेश पटेल फाऊंडेशनच्या अध्यक्षा व विश्वस्त, झायडस फाउंडेशन उपाध्यक्ष सौ. मेहा शर्विलभाई पटेल यांच्या हस्ते बंधारा साईट, मौजे गोदी ता. शिरपूर येथे 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मौजे गोदी येथे 4 व मांजरोद येथे 1 असे एकूण 5 चेक बंधाऱ्यांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता ‘राजगोपाल भंडारी हॉल’, आर.सी.पटेल मेन बिल्डिंग, शिरपूर येथे झायडस फाउंडेशन उपाध्यक्ष सौ. मेहा शर्विलभाई पटेल यांच्या हस्ते विविध लोकार्पण व आर्थिक निधी वितरण समारंभ झाला.

मुकेशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलला ॲटमॉस्पिरिक वॉटर जनरेटर मशीन भेट देण्यात आले. शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल विद्यालय खर्दे बु., आर.सी.पटेल विद्यालय खंबाळे, आर.सी.पटेल विद्यालय बभळाज, आर.सी.पटेल आश्रमशाळा निमझरी, आर.सी.पटेल आश्रमशाळा वाघाडी या 5 शाळांमध्ये स्वच्छतागृहांसाठी निधी वाटप करण्यात आला. झायडस लाईफ सायन्सतर्फे गुणवंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती वितरण, 200 लाभार्थ्यांना चल जलकुंभाचे वाटप तसेच आदिवासी भागातील दोन महिला भगिनींना पीठाच्या गिरण्या देण्यात आले.

यावेळी आ. काशिराम दादा पावरा म्हणाले, आ. अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांच्या सोबत आता चिंतनभाई पटेल, परिवारातील मुली देखील पटेल परिवाराचा वारसा पुढे नेत आहेत याचा आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान व आनंद आहे. संपूर्ण परिवार तालुक्याच्या सेवेसाठी एकत्र आल्याचे पाहून शिरपूर तालुक्याला ही ईश्वरीय देण असल्याचे दिसून येते. भाई आपण व परिवार महान आहे. भाईंच्या संकल्पनेतील ‘शिरपूर 60’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प तालुक्याला मोठी देण आहे. भाई गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात. त्यातून उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा मेहा दिदी पटेल यांच्या मार्फत मदत दिली जाते. मेहा दिदी व द्वेता दिदी यांनी शिरपूर तालुक्याच्या सेवेसाठी विचारपूर्वक कार्य हाती घेतले आहे. भाई  व मी मनापासून विकास करतोय, अपप्रचार होऊ देऊ नका. तालुक्यात शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेच्या हिता साठी काम होतेय. द्वेता दिदीने राबविलेल्या ‘एक मुठठी अनाज योजना’ मार्फत ज्याच्याकडे आहे त्याने दुसऱ्याला द्यावे, असा मोठा सेवाभावी संदेश सर्वदूर गेला आहे. असे सर्वत्र घडल्यास भारतात कोणीही भुखे राहणार नाही. असे कार्य भारत देशाच्या सेवेसाठी प्रेरणादायी ठरेल.  

माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, पटेल परिवारातील चिंतनभाई पटेल, सौ. मेहा पटेल, स्नेहा पटेल, द्वेता पटेल व सर्वच जण तालुक्याच्या सेवेसाठी तत्पर आहेत. लवकरच सुरु होणाऱ्या तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल मध्ये ‘अमरिशभाई पटेल जीवनदायी योजना’ कार्यान्वित करुन जन्मलेल्या बाळाला पहिल्या दिवसापासून 6 वर्षे पर्यंत दत्तक योजना राबविणार आहोत. पंकजभाई पटेल यांच्या प्रेरणेतून मेहा पटेल देखील सेवाभावी कार्य सुरु करुन आर्थिक सहकार्य करण्यास तत्पर असतात. शिरपूर तालुक्याने आमच्यावर विश्वास ठेवला असून सर्वांना सुखसोयी मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत असेही भाई म्हणाले. तसेच आजपासून झायडस, तपन मुकेश पटेल फाउंडेशन, मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट एकत्र काम करतील असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट डायरेक्टर कु. द्वेता पटेल म्हणाल्या, अहमदाबाद येथून मेहा दिदी पटेल शिरपूरला व तालुक्यासाठी सहकार्य करत आहेत, याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध योजना यशस्वी करणाऱ्या संपूर्ण टीम चे मी मनापासून आभार मानते.

यावेळी आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, सौ. मेहा शर्विलभाई पटेल, मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट डायरेक्टर कु. द्वेता दिदी पटेल, उज्जैन चे अरविंद बाठीया, संजिव अमीन, प्रदिप बाठीया, संस्था सचिव सौ. रेषा पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सुभाष दादा कुलकर्णी, बिनिता वरदिया अहमदाबाद, माजी नगराध्यक्षा सौ.संगिता देवरे, प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राचार्य सौ. मंजू सिंह, समन्वयिका सौ. पौर्णिमा पाठक, डॉ. सुप्रिया पंतवैद्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिरपूर पॅटर्न प्रोजेक्ट डायरेक्टर टी.आर.दोरीक, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मान्यवर, तालुक्यातील आदिवासी भागातील महिला, पुरुष, लाभार्थी महिला, विद्यार्थी, त्यांचे पालक, नागरिक, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमात सौ. मेहा दिदी पटेल यांनी गुजरात मध्ये केलेल्या लाखो लोकांसाठी शिक्षण, आरोग्य, साथ, विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबाबत डॉ. बिनिता वरडिया, अहमदाबाद यांनी सविस्तर विवेचन केले.

 प्रास्ताविक सुभाष दादा कुलकर्णी, सूत्रसंचालन विवेकानंद ठाकरे व आभार सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी मानले.

WhatsApp
Follow by Email
error: