बातमी कट्टा:- सोनगीर येथील दापुरा रस्त्यालगतच्या मास्टरनगर भागातील बेघर वस्तीत दि. 3 रोजी मध्यरात्री झालेल्या घरफोडी प्रकरणी गावातील तीन संशयितांना सोनगीर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांना मा.न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोनगीर येथील दापुरा रस्त्यालगतच्या लालबावली, मास्टर नगर या बेघर वस्तीत राहणारे अखिल खा शमीर खान पठाण यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून दि. 3 मार्च रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घरातील 57,500 रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती.याबाबत घरमालकाने सोनगीर पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल केली.या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी तपासाचे चक्र फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीवरून अबू सुफियान उर्फ पोंट्या शेख अजीम कुरेशी, जुबेर लतीफ पठाण, अजहर शेख अब्दुल्ला सर्व रा. सोनगीर यांना ताब्यात घेतले.अधीक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 19 हजार दोनशे रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर संशयितांनी सोनगीर गावात यापूर्वी चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
सदरची कारवाई संजय बोरकुंड पोलीस अधीक्षक, धुळे. किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक, प्रदीप मैराळे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक विजय चौरे, रविंद्र राठोड, अजय सोनवणे, कुदरत अली सय्यद, संजय देवरे, रमेश गुरव, राम बोरसे, विजय पाटील यांनी केली आहे.