बातमी कट्टा:- पैसे फेडूनही तक्रारदाराला मारहाण करत जबर मारहाणीतून कर्णबधिर करणाऱ्या चार अवैध सावकारांना धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.दर महिना दहा ते पंधरा टक्के व्याज आकारणी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील गल्ली नंबर सहामध्ये गुरुकृपा इलेक्ट्रीकल्स व डेकोरेटर्सचे मिनेश महेश्वर बोडस वय 46 हे वास्तव्यास आहेत.त्यांनी धुळे शहरातील प्रमोद(आबा) काशिनाथ वाणी,जितेंद्र बाबूराव वाघ,नीलेश हरळ आणि नितीन ऊर्फ बबन मधुकर थोरात सर्व र.धुळे यांच्यांकडून व्याजाने पैसे घेतले होते.या बदल्यात जबरदस्तीने प्रती महिना दहा ते पंधरा टक्के महिना व्याज आकारणी करण्यात येत होती.वेळोवेळी हप्ते फेडूनही चारही अवैध सावकारांनी मिनेश बोडस यांचे आर्थिक शोषण केले.
व्याजाच्या पैशांची पुर्ण परतफेड करुनही पुन्हा तक्रारदार बोडस यांच्याकडे पैशांची मागणी करत त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारदार मिनेश बोडस यांना चितोड गावापुढे घेऊन जात जबर मारहाण करण्यात आली.त्यात तक्रादार मिनेश बोडस यांच्या डाव्या कानाचा पडदा फाटला.याबाबत आझादनगर पोलीस स्टेशनात चारही संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.त्या चारही संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले.आर्थिक गुन्हा शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.