
बातमी कट्टा:- जप्तीची कारवाईसाठी बॅंकेचे अधिकारी कर्मचारी घरी गेल्यानंतर घरातील वृद्धाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि १२ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृत वृध्दाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील हरीचंद्र दगा पाटील वय ८८ यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेतून पॉली हाऊस,पिक कर्ज व ठिबक कर्ज घेतले होते.या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून त्यांच्या घरावर घरजप्तीसाठी बॅंकेकडून कळविण्यात आले होते.काल दि १२ रोजी बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी घरजप्तीसाठी हरीचंद्र पाटील यांच्या घरी पोहचले.हरीचंद्र पाटील यांना भेटून घरातील संपूर्ण सामान काढण्याबाबत सांगण्यात आले.यावेळी हरीचंद्र पाटील यांनी घरात असलेल्या विषारी औषध प्राशन करून विषारी औषध पिले आहे. आता लावा घराला कुलूप असे सांगून घराबाहेर विषारी औषधाची बाटली फेकली. यावेळी पोलिस पाटील यांच्या मोटरसायकलीवर हरीचंद्र पाटील यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी उपचारादरम्यान हरीचंद्र पाटील यांचा मृत्यू झाला.उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला.

शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे यावेळी नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाला सांगितले आहे.दि १३ रोजी दुपारपर्यंत हरीचंद्र पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नाही.याप्ररणी शासनाकडून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
