
बातमी कट्टा:- धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आज (दि.१४) सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद घेत स्व:खुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती अध्यक्षा अश्विनी पवार यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यात भाजप पक्षातील सदस्यांनी रेटा लावला होता. मागील महिन्यात जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटनेत्या कुसुमबाई निकम यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजीनाम्यासंदर्भात पत्र दिले होते. बावनकुळेंनी अध्यक्ष राजीनामा देत नसतील तर अविश्वास ठराव आणण्याचे सूचित केले होते. त्यानंतरही राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नसलेल्या अध्यक्षा पवार यांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश झुगारून पदावर कायम होत्या. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप सदस्यांनी रेटा सुरुच ठेवला होता. अखेर पक्षनेत्यांच्या आदेशापुढे झुकत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विभागीय आयुक्तांकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे. जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेत त्यांनी पक्षाच्या निर्णयानुसार स्व:खुशीने कुणावरही आरोप प्रत्यारोप न करता राजीनामा देत असल्याचे सांगितले. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, धुळे पंचायत समितीच्या सभापती वंदना मोरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार यांनी राजीनामा दिल्याने आता पुढच्या अध्यक्षाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी धुळे तालुक्यातील लामकानी गटाच्या सदस्या धरती देवरे आणि शिंदेखडा तालुक्यातील विखरण गटाच्या सदस्या कुसुम निकम यांच्यात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच कळणार आहे.