
बातमी कट्टा:- देशातील गोर गरीब जनतेला दोन वेळचे अन्न मिळावे याकरीता केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असा ‘अन्न सुरक्षा कायदा’ आहे. मात्र त्या कायद्यालाच हरताळ फासला जात असल्याने व दुकानदाराच्या मनमानी कारभारा विरोधात जोयदा येथील लोकनियुक्त सरपंच यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे तक्रारी निवेदन देवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील जोयदा गावात नवीन रेशनकार्ड बनवणे, नवीन नावे समाविष्ट करणे यांची मागणी करून येथील रेशन दुकान क्रमांक 17 चा दुकानदार गोविंदा भाया पावरा याने लोकनियुक्त सरपंच यांच्या निर्वाचित पदाला 2 वर्षे पूर्ण होवून देखील आजपर्यंत गाव पातळीवरची अन्न सुरक्षा समिती स्थापन केली नाही. दर महिन्याला किती क्विंटल गहू आणि किती क्विंटल तांदुळ येतो? याच्या पावत्या दाखवत नाही. स्टॉक रजिस्टर दाखवले नाही. तक्रार नोंदवही (कंप्लेन रजिस्टर) दाखवली नाही. दुकानाच्या दर्शनी भागात मालाची माहिती, सुचना फलक लावत नाही. महिन्याच्या शेवटच्या 2-3 दिवस माल केला जातो. अशा गंभीर प्रकारच्या समस्यांची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे. सदर दुकानदारावर अन्न सुरक्षा कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास ग्राम पंचायत सदस्यांसह गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.