बातमी कट्टा : महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती धुळे विभागाचे प्रवर अधीक्षक प्रताप सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
एजंट भरतीसाठी पात्रता अशी : उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण, बेरोजगारी किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवक, माजी जीवन सल्लगार, विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतच्या ज्ञानावर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. ती एनएसजी अथवा केव्हीपीच्या स्वरूपात राहील.
प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. तो IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. IRDA ची परवाना परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे उमेदवारास अनिवार्य राहील. निवड झालेल्या उमेदवारास त्यांनी मिळविलेल्या पॉलिसीवर टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी प्रवर अधीक्षक डाक घर कार्यालय, धुळे 424001, येथे विहित नमुन्यातील अर्ज आणि सर्व शैक्षिणिक प्रमाणपत्र तसेच PAN CARD, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्त ऐवज सोबत 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधार कार्डची झेरॉक्स, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र (असल्यास) अर्जासह आणावे. अर्जाचा नमुना अथवा अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयास संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपात असून पूर्णत:कमिशन तत्वावर आधारित राहील.