
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील कोविड-19 मध्ये मयत झालेल्या 57 व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य अनुदान अद्यापपावेतो मिळाले नसून शासन स्तरावरून लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा तसेच सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन सादर केले.

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी 4 एप्रिल 2022 रोजी आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, विधी विभागाचे ऍड. बाबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हिरालाल पावरा यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
गेल्या वर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावाने शिरपूर तालुक्यात अनेक व्यक्तींना मृत्युने कवटाळल्याचे दुर्दैवी प्रसंग असंख्य कुटुंबावर ओढावले. केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने कोविड-19 मध्ये दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसदारांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्याबाबत घोषणा केल्या. परंतु, छोट्या छोट्या तांत्रिक त्रुटींमुळे शिरपूर तालुक्यातील 57 लाभार्थी वारसदारांना सानुग्रह सहाय्य अनुदान प्राप्त झालेले नाही.

शासनाने व सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक मदत देण्याविषयी जाहीर केले असताना देखील तसेच शासनाच्या मुदतीत त्रुटींची पूर्तता करून, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे कागदपत्रांची रीतसर पूर्तता करुन अर्ज सादर केल्यावर देखील संबंधित 57 मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक लाभ अद्यापपावेतो मिळालेला नाही. याबाबत आमदार काशिराम पावरा व सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या कामी लक्ष घालून मदत मिळण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
