बातमी कट्टा:- रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.घटनास्थळी पोलीस पथकासह श्वान पथक,फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.

शिरपूर तालुक्यातील निमझरी ते सामर्यापाडा रस्त्यालगत निमझरी शिवारात पडश्याचा झाडाखाली सामर्यापाडा येथील संजय बोंग्या पावरा वय 31 या तरुणाचा आज दि 16 रोजी सकाळी मृतदेह आढळून आला.घटनास्थळ जवळील रस्त्यावर मयत संजय पावरा याची मोटारसायकल व चप्पल मिळुन आली आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, सा.पोलीस निरीक्षक गणेश फड,छाया पाटील यांच्यासह शोध पथक दाखल होत चौकशी करण्यात येत असून घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक पथक दाखल होत तपास सुरु आहे.

प्राथमिक अंदाजनुसार मयत संजय पावरा हा मोटारसायकलीने रात्रीच्या सुमारास सामर्यापाडा येथे घरी जात असतांना निमझरी ते सामर्यापाडा रस्त्यालगत रस्त्यावर अज्ञात संशयितानी संजय पावरा याला अडवून झटापटी करत रस्त्यालगत असलेल्या पडश्याचा झाडाखाली फरफटत घेऊन जात दगडाने डोके ठेचून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.घटनास्थळी रक्त असलेले दगडे मिळुन आले आहेत.पुढील तपास पोलीसांकडून सुरु असून खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
