
बातमी कट्टा:- दुधाचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे या दुधाच्या गोरख धंद्यात शिरपूरचे देखील कनेक्शन उघड झाले आहे.या टोळीतील शिरपूर तालुक्यातील पळासनेरचा एक संशयित फरार झाला आहे. पोलीसांनी या कारवाईत सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात असलेल्या कुंड्यापाणी येथे भेसळयुक्त दुधाचा गोरखधंदा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलीस महानिरीक्षकांचे पथक,अडावद पोलीस व अन्न व औषध प्रशासन जळगाव पथकाने शिताफीने धाड टाकली.कुंड्यापाणी येथे संभाजी मोतीराम पाटील यांच्या शेतात लक्ष्मण भरवाड रा.पळासनेर ता.शिरपूर हा पंटरांच्या मार्फत पामतेल व दुध पावडरचे मिश्रण करून दुधात भेसळ करत असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती.दि 24 रोजी रात्रीच्या सुमारास पोलीसांनी केलेल्या कारवाई दरम्यान दुध पावडर,पाम तेल, मिक्सर, भेसळयुक्त दुध,दुधाचे कॅन,बादल्या,दुध वाहतूकीसाठी लागणारे दोन वाहने व मोबाईल असा एकुण 11 लाख 18 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. यावेळी भिकन अशोक साळुंखे व हर्षल पंढरीनाथ पाटील दोघे रा.चिंचोली ता.यावल,हेमंत रतिलाल महाजन रा.धानोरा व सारा बुटा भरवाड लिंबडी गुजरात या चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील लक्ष्मण देवा भरवाड हा फरार झाला आहे. या दुधाचा काळाबाजार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.