
बातमी कट्टा:- शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाचे उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी खरीप हंगाम 2023 पीकस्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ही पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार असून खरीप हंगाम पीकस्पर्धेसाठी ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सुर्यफुल, व वरई अशा बारा पिकांची निवड केली आहे. तर रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहु, हरभरा, करडई, व जवस या पाच पिकांचा समावेश केला आहे. पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र (केवळ अनुसूचित जमातीचा असल्यास) आवश्यक राहील.
तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धेत भाग घेतांना शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे,व ती जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे. तालुका पातळीवरील पिक स्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांना भाग घेता येईल. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पिक स्पर्धेचे अर्ज शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांस एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. या पीकस्पर्धेसाठी तालुकापातळीवर पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार रुपयांचे बक्षिस राहील. तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे बक्षिस 5 हजार रुपये असेल. तसेच राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार रुपये बक्षिस असेल.
खरीप हंगामाच्या मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै,2023 तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन भूईमूग, सूर्यफुल, वरई पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट, 2023 अशी आहे. तीनही स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी परिपूर्ण भरलेला अर्ज कृषी सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.तडवी यांनी केले आहे.