बातमी कट्टा:- साप असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या नेचर कॉन्झर्व्हेशन फोरमचे सर्प मित्राला “फॉस्टर्न मांजर्या” हा साप असल्याचे निष्पन्न झाले.धुळे जिल्ह्यात या जातीचा साप आढळल्याची ही पहिलीच घटना असून खान्देशातील दुसऱ्यांदा हा साप आढळून आला आहे. याबाबत वनविभागाकडे नोंद करण्यात आली आहे.
शिरपूर शहरातील विठ्ठल लॉन्समागे एका झाडावर साप असल्याची माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन फोरमचे सर्पमित्र अभिजित पाटील यांना मिळाली होती.सर्पमित्र अभिजित पाटील व मयंक नेरकर हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी निरीक्षण केल्यानंतर सामान्यत: खान्देशात न आढळणारा “फॉस्टर्न मांजर्या” हा साप असल्याचे निष्पन्न झाले.त्या सापाला सुरक्षितरित्या ताब्यात घेत त्याची वनविभागाकडे नोंद करण्यात आली असून लवकरच वनविभागाच्या अधिकार्यांसमोर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
धुळे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असुन खान्देशातील दुसरी ही घटना आहे.पाच फूट सात इंच लांबीच्या “फॉस्टर्न मांजर्या” सापाच्या अंगावर तपकिरी रंगाच्या एकाआड चौकोनी रेषा आहेत.डोक्यावर गडद काळी रेष आहे. फॉरेस्ट मांजर्या निमविषारी असून तो प्रामुख्याने झाडांवरच राहतो.काळ्या व तपकिरी रंगात असलेल्या या सापाचे प्रमुख खाद्य लहान पक्षी, सरडे व पाली आहेत. जानेवारीमध्ये चोपडा (जि.जळगाव) येथे फॉस्टर्न मांजर्या आढळल्याची नोंद असून त्यानंतर धुळे जिल्ह्यात तो प्रथमच आढळून आला.