बातमी कट्टा:- वारंवार तक्रार करुन देखील न्याय मिळत नसल्याने मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या धुळे येथील महिलेचा उपचारादरम्यान काल दि २७ रोजी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर धुळे पोलीसांनी अखेर मोहाडी पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.
मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शितल गादेकर प्रकरणी आता पोलिसांनी त्यांच्या मृत्यूनंतर धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. शितल गादेकर यांचे पति रवींद्र गादेकर यांच्या मालकीचा MIDC मधील प्लॉट हा एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी संगणमत करून बनावट सह्या आणि फोटोंचा गैरवापर करून प्लॉट विकल्याचा आरोप शितल गादेकर यांनी केला होता. या प्रकरणी संबधीतांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती.
मात्र पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणी तपास पूर्ण करण्यात आला, त्यात काही निष्पन्न झाले नाही, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता. मात्र न्याय मिळत नसल्याने शितल गादेकर यांनी अखेर मंत्रालयात विष प्राशन केले होते.आणि काल उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.
मंत्रालयासमोर आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी शितल गादेकर यांच्या तक्रारीलाच फिर्याद म्हणून नोंदवून घेतले आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये नरेश कुमार मुनोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी संशयित वाढण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे.मात्र तक्रार केली तेव्हाच गुन्हा दाखल झाला असतात तर शितल गादेकर यांचा जिव गेला नसता अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त ह़ोत आहे.