
बातमी कट्टा:- चुलत शालकाचा विवाह समारंभ आटोपून मोटरसायकलीने नातेवाईकांच्या घरी जात असतांना भरधाव डंपरने रस्त्याच्या वळणावर मोटरसायकलीला जोरदार धडक देत 32 वर्षीय मोटरसायकल चालक व एक 14 वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली असून यात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.अपघातानंतर डंपर देखील पलटी झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 12 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील शेवाळी येथील सागर भिमराव कोळी हे शिरपूर येथील वाल्मिक नगर भागात चुलत शालकाच्या विवाह समारंभासाठी शिरपूर येथे मोटरसायकलीने आले होते. शिरपूर येथून विवाह समारंभ आटोपून सागर कोळी हे दिव्या ज्ञानेश्वर कोळी वय 14 हिला घेऊन मोटरसायकलीने नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील वाडी खु. येथे जात असतांना वाडी बु.गावाजवळील रस्त्यावरील वळणावर शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने मोटरसायकलीला धडक देत सागर कोळी व दिव्या कोळी यांना चिरडले.यात सागर कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर दिव्या कोळी यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व तेथून धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.डंपर ईतका भरधाव होता की अपघातानंतर डंपर देखील रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाले आहे.

सागर कोळी हे खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी,भाऊ बहिण व एक मुलगी व लहान मुलगा होत.घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस किरण बागुल, प्रेमसिंग गिरासे,शांतीलाल पावरा हे दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.