
बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूकीच्या निकालाला गालबोट लागले आहे. निकालानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली असून यादरम्यान एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.मात्र या घटनेबाबत पोलीसांनी कुठलीही पुष्टी केलेली नाही.

साक्री नगरपंचायत पोटनिवडणूकीचा दि 19 रोजी निकाल होता.निकालानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली यावेळी भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या मोहीनी जाधव या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर भावाला मार लागल्याने त्याला देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मयत मोहिनी जाधव या प्रभाग 11 मधील पराभूत उमेदवाराच्या नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.मयत अवस्थेत मोहीनी जाधव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली.भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा मयत मोहिनी जाधव यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी रात्री निर्णय घेतला.साक्री शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे.शवविच्छेदनानंतर मयत मोहिनी जाधव यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षाची सत्ता असलेल्या या साक्री नगरपंचायतीत भाजपने स्थान मिळवले आहे.भाजपने 11 जागा ताब्यात घेतल्या तर शिवसेना पक्षाने 4 काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक जागा प्राप्त केले आहेत.
