
बातमी कट्टा:-१२ डिसेंबर २०२३ अंगावर रॉकेल फेकून एकाला जिवंत जाळल्याची घटना घडली होती.दि १५ डिसेंबर २०१६ त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यातील तिघांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे.जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. जे. बेग यांनी हा निकाल दिला.
मिळालेल्या माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे १२ डिसेंबर २०१६ ला रात्री आठच्या सुमारास आरिफ शेख नईम पान खाण्यासाठी जात होते. तेव्हा लहान मुलांच्या भांडणावरून संशयित अब्दुल रमजान मन्यार याने मागून येऊन आरिफच्या अंगावर रॉकेल फेकून पेटवून दिले. त्यात ६१ टक्के भाजल्याने आरिफचा १५ डिसेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात अब्दुल रमजान मन्यार, रऊफ शेख मन्यार, रेहाना रऊफ शेख मन्यार व सुलतानाबी शेख रमजान मन्यार यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.
घटनेचे तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या (क्रमांक तीन) न्यायालयात सुरू होते. सरकारपक्षातर्फे पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, अन्य साक्षीदार, डॉक्टर, तपास अधिकारी आदी दहा साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली होती.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गणेश वाय. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत संशयितांनाजन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायधीश बेग यांनी संपूर्ण पुराव्याचा व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा विचार करून अब्दुल रमजान मन्यार याला जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजारांचा दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेचा आदेश दिला. तसेच उर्वरित संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले.