बातमी कट्टा:- अचानक आलेल्या वादळी वारासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्ग साथ देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत असते. यावेळेस देखील तुफान गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोरील घास हिसकावला गेला आहे.”बातमी कट्टा” टिम काल नुकसानग्रस्त भागात बातमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले होते यावेळी आपले व्यथा मांडतांना शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.फक्त कागदे न रंगवता मोबदला मिळावा अशी आर्त हाक त्यांनी यावेळी केली.
आम्ही काल नुकसानग्रस्त भागाची बातमी करण्यासाठी शिरपूर तालुक्यातील वाडी परिसरासह कुवे अर्थे कडून खामखेडा मार्गे जात असतांना टेंभे भरवाडे टेकवाडे रस्त्याजवळ पोहचलो. यावेळी एका शेतात संपूर्ण तोडणीला आलेल्या टमाट्याचे क्षेत्र जमिनदोस्त झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.तेथेच आणखी दोन अडिच महिनापुर्वी लागवड केले टमाट्यांचे पिक जमिनदोस्त झाले होते.तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या केळीचे पिक मोडून खाली पडलेले दिसले.
आम्ही टमाटेच्या क्षेत्रात पोहचलो त्यावेळी तेथे दोन तिन शेतकरी उभे होते.टमाटे क्षेत्राच्या मालकाला आम्ही शेतात बोलवले व संपूर्ण माहिती जाणून घेतली. भरवाडे येथील शेतकरी कुशोर सुदाम पटेल यांनी टमाटे क्षेत्रात येऊन माहिती दिली.तोडणीला आलेला संपूर्ण टमाटे चिखलात रुतले होते. टमाटे पिक जमीनदोस्त झाले होते.डिड ते दोन लाख रुपये खर्च करुन यांनी टमाटे पिक उभे केले होते.उद्या तोडणी करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र त्याआधीच अचानक वादळी वारासह गारपीटने संपूर्ण नुकसान केले.तोंडा समोरील घास हिसकावला गेला.ते बोलतांना अवर्जून म्हणले की दरवेळेस नुकसान झाले की पंचनामे केले जातात कागद रंगवला जातात मात्र मोबदला काहीच मिळत नाही शासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावे अशी अर्त हाक किशोर पाटील यांनी केली.
या पुढेच आणखी राहुल चौधरी यांची शेती आहे. त्यांच्या मुलाने आमच्याशी बोलतांना सांगितले की,अडीच एकर क्षेत्रात त्यांनी दोन महिन्यांपूर्वी टमाटे पिकाची लागवड केली होती.टमाटे पिकांना बांबूचा आधार देऊन उभे करावे लागतात.या टमाट्यांच्या पिकासाठी 20 हजार किंमतीचे बांबु देखील आणले होते.आज उद्या मध्ये ते लावयचे म्हणून त्यांनी शेतात बांबू आणून ठेवले होते.मात्र सायंकाळी अचानक आलेल्या गारपीट व वादळी वारामुळे सर्वच अडीच एकरातील टमाटे पिक जमीनदोस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.या परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र होते.सर्व क्षेत्रात केळी,पपई टमाटे, हरभरा,गहु पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
आम्ही पुढे जात असतांना टेंभे – रुदावली रस्त्यावरील एका केळीच्या क्षेत्राजवळ आम्ही थांबलो.यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडतांना सांगितले की या केळी बागेला पावणेदोन लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.या केळीचे उद्या परवा उत्पन्न मिळणार होते मात्र अचानक सायंकाळी पाच नंतर आलेल्या वादळी वारासह गारपिटीमुळे संपूर्ण केळी जमिनदोस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिरपूर तालुक्यातील टेंभे,चांदपुरीसह, भरवाडे,अर्थे, जातोडे, बोरगाव ,वनावल,रूदावली,करवंद,शिंगावे,हिंगोणी भागातील परिसरात सर्वत्र शेतात फक्त नुकसानीचे दृश्य बघुन मन सुन्न झाले होते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना “बातमी कट्टा” टिमसोबत बोलतांना अश्रु अनावर झाले होते. नुकसानाची माहिती देतांना अंतकरण दाटून आले होते.या तुफान गारपीटीत शिरपूर तालुक्यातील टेंभे, चांदपुरी, भरवाडे, अर्थे,जातोडे, बोरगाव ,वनावल,रूदावली,शिंगावे हिंगोणी परिसरातील 2 हजार 235 शेतकऱ्यांच्या 2 हजार 284 क्षेत्रातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रात्रंदिवस करुन उभे केले पिक डोळ्यासमोर जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.मोठ्या अंतकरणाने शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडल्या आहेत.
टेंभे बु गावातील 6 ते 7 घरांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे तर वनावल येथे गारपीटमुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे.नुकसान झाले की पंचनामे होतात कागदे रंगवले जातात मात्र मोबदला मिळत नाही.फक्त कागद न रंगवता मोबदला पण मिळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.